All the elected councillors’ votes will be for Pravin Pote : अमरावती जिल्ह्यात महसूल मंत्र्यांच्या सूचक विधानामुळे चर्चा तापली
Amravati राज्यात सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराची जोरदार लगबग सुरू आहे. या गदारोळात भाजपच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मात्र खुला झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारणी येथे खासदार नवनीत राणा यांना, तर परतवाडा येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेचे माजी सदस्य प्रवीण पोटे यांना दिलेल्या सूचक आश्वासनांमुळे ही चर्चा अधिकच जोर धरत आहे.
धारणी येथे आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणापूर्वी संबोधित करताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, “दादा, तुमच्याप्रमाणे मलाही या जनतेच्या साक्षीने ‘मी पुन्हा येईन’ म्हणायचे आहे.” याचवेळी त्यांनी उपस्थितांकडे वळून, “माझ्या माहेरवासीयांनो, मला पुन्हा लोकसभेत पाठवणार की नाही?” असा प्रतिप्रश्न करत वातावरण रंगवले.
Local Body Elections : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका एप्रिलमध्ये?
या वक्तव्यांनंतर निर्माण झालेला पेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून सोडवला. त्यांनी थेट संकेत देत नवनीत राणा यांना पुन्हा खासदारकीची संधी मिळणार असल्याचे सूचित केले. यामुळे राणा यांच्या पुनर्वसनाला भाजपकडून ‘होकार’ मिळाल्याचे स्पष्ट झाले.
परतवाडा येथील जाहीर सभेत बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “प्रवीण पोटे, तुम्ही काळजी करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे की अमरावती जिल्ह्यात जेवढे नगरसेवक निवडून येतील, त्या नगरसेवकांची मते प्रवीण पोटे यांच्यासाठी घ्यायची आहेत.”
या वक्तव्याने प्रवीण पोटे यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याचे संकेत अधिक बळकट झाले. म्हणजेच त्यांच्या पुनर्वसनाचा मार्गही जवळपास मोकळा असल्याचे दिसत आहे.
बावनकुळे यांनी या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा संदेश स्पष्टपणे पोहोचवला. मात्र पुढील काही गोष्टी ‘एकांतात सांगू’ असे म्हणत त्यांनी विराम घेताच सभागृहात खसखस पिकली. तसेच, “निवडणूक आयोगाच्या निर्देशांपलीकडे जाऊ नका,” असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला. यानंतर मात्र कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली — दोघांचे पुनर्वसन ठरले, आता तिसरा कोण?








