Nagar Parishad Elections 2025 : राज्यभर मतदानाला ठिकठिकाणी ब्रेक !

Leopard terror, EVM malfunction, chaos and chaos : बिबट्याची दहशत, ईव्हीएममध्ये गडबड, गोंधळ-हाणामारी

Mumbai: महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असताना अनेक भागांत तांत्रिक अडथळे, गैरप्रकार आणि सुरक्षेची भीती यामुळे मतदान प्रक्रियेला अनेक ठिकाणी ब्रेक लागला. पुणे, बदलापूर, बुलढाणा, वाशिम आणि नांदेड या ठिकाणांसह राज्यातील विविध शहरांमध्ये ईव्हीएम बिघाड, बोगस मतदान, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि शिस्तभंगाच्या घटनांनी निवडणूक प्रक्रियेवर सावट निर्माण केले. सकाळपासून सुरु झालेले मतदान अपेक्षेपेक्षा मंदावल्याचे चित्र दिसत असून प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करावा लागत आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि शिरूर या बिबट्या प्रभावित भागात भीतीचे वातावरण पसरल्याने सकाळच्या वेळेत मतदान विशेषतः मंदावले. प्रचारादरम्यान उमेदवारांना ज्या भागांत सुरक्षिततेच्या अडचणींमुळे रात्री प्रचार मर्यादित ठेवावा लागत होता, त्याच भागांत आता मतदारही सकाळच्या वेळेत घराबाहेर पडण्यास संकोच करताना दिसले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र लक्षात घेऊन पोलिसांनी सेक्टर पेट्रोलिंग वाढवत नागरिकांना निःभीतपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Sudhir Mungantiwar : विकासाचे मुद्दे शून्य, काँग्रेसवाल्यांच्या मेंदूचीच झाली चोरी, मुनगंटीवारांचा काँग्रेसवर घणाघाती हल्ला !

बदलापुरात मतदानाच्या दिवशीच वातावरण तापले. पश्चिम बदलापूरमधील गांधी नगर टेकडी एसटी बसस्थानक परिसरात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारांना स्लिप वाटणे आणि बूथ उभारणीवरून जोरदार हाणामारी झाली. काही वेळ वातावरण पूर्णपणे बेकाबू झाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत मोठा फौजफाटा तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून परिसरात अजूनही तणाव कायम आहे.

बुलढाण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर बोगस मतदानाची धक्कादायक घटना घडली. एका युवकाला बोगस मतदान करताना पकडण्यात आले आणि संतप्त प्रतिनिधींनी त्याला मारहाण केली. गोंधळात तो पळून गेला, मात्र बोगस मतदानामुळे केंद्रावर वादग्रस्त वातावरण निर्माण झाले. नांदेडच्या मुदखेड नगरपालिकेत बॅलेट युनिटमध्ये बिघाड झाल्याने मतदान १५–२० मिनिटे थांबावे लागले. एकदा दाबलेले बटन वर न येण्याच्या समस्येमुळे युनिट तातडीने बदलण्यात आले. वर्ध्यात एका मतदाराने मतदार सहाय्यक कर्मचाऱ्याने दुर्लक्षामुळे मतदानानंतरही बोटावर शाई न लावल्याचा आरोप केला आणि चूक लक्षात आल्यावर शाई लावण्यात आली.

Sudhir Mungantiwar : बल्लारपूर जनतेने दिलेले प्रेम मी सेवेतून फेडणार..!

वाशिमच्या मंगरूळपीर नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग ८ मधील बूथ क्रमांक ३ वर ईव्हीएम मशीन ९ वाजता बंद पडली. मशीन बदलण्यात आल्यानंतरही नवा युनिट काही वेळात पुन्हा बंद पडल्याने मतदान वारंवार ठप्प झाले. रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. राज्यातील इतर मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत चालू असतानाही तांत्रिक अडचणी आणि तणावाच्या घटना वाढल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

Election Commission : यशोमती ठाकूरांचा सरकार, आयोगावर थेट आरोप; म्हणाल्या ‘तो’ निर्णय मनमानी !

आजचा मतदान दिवस तांत्रिक त्रुटी, सुरक्षेची भीती आणि राजकीय संघर्ष यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक आव्हानात्मक ठरला असून संध्याकाळपर्यंत मतदान खर्ची पडलेल्या वेळेची भर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पुढील तासांत मतदानाचे एकंदर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

___