Controversy erupts over vote counting for elections : नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीवर वाद पेटला
Mumbai: महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत प्रचंड राजकीय तापमान वाढले असताना, नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेवर मोठ्या अनिश्चिततेचे सावट आले आहे. आज राज्यभर मतदान पार पडत असतानाच न्यायालयाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलून एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिले. हा निर्णय राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का मानला जात असून यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुका घोषित व्हाव्यात आणि नंतर निकाल पुढे जावेत असा प्रकार मी 25–30 वर्षातील निवडणुकांत प्रथमच पाहतोय. मला ही पद्धत योग्य वाटत नाही. पण खंडपीठ स्वायत्त आहे आणि त्यांचा निकाल आपल्याला मान्य करावा लागेल,” असे फडणवीस म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेतील अचानक आलेल्या अडथळ्यांमुळे मेहनत घेणाऱ्या उमेदवारांचा भ्रमनिरास होतोय, अशी खंत त्यांनी स्पष्टपणे मांडली. “इलेक्शन कमिशन सुद्धा स्वायत्त आहे, पण व्यवस्थेच्या फेल्युअरमुळे जे काही चुकीचं नसताना उमेदवारांना त्रास होणं योग्य नाही. आयोगाने पुढील निवडणुकांसाठी सुधारणा केल्या पाहिजेत. पुढे मोठ्या प्रमाणात निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये,” असे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाने यंत्रणेत सुधारणा करण्याची स्पष्ट मागणी केली.
Nagar Parishad Elections 2025 : राज्यभर मतदानाला ठिकठिकाणी ब्रेक !
राज्य निवडणूक आयोगाची चूक आहे का, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर फडणवीसांनी थेट आरोप न करता कायद्याच्या चुकीच्या अर्थावर बोट ठेवले. “मी चूक म्हणणार नाही. कायद्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या वकिलांनी काय सांगितलं आहे माहिती नाही, पण माझ्या मते चुकीची व्याख्या झाली आहे. इतकी वर्ष निवडणुका लढवतोय, नियम माहित आहेत, वकिलांशी बोललो आहे— ज्याठिकाणी संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे त्या जागांवरही एखादा कोर्टात गेला म्हणून संपूर्ण राज्याची मतमोजणी पुढे ढकलणे हे तत्त्वतः योग्य नाही. नाराजी माझी वैयक्तिक नाही, पण कायद्याच्या आधारावर आहे,” असे ते म्हणाले.
Municipal elections 2025 : मतदानादरम्यान शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
यामुळे मतमोजणीच्या तारखेची उत्सुकता तीन आठवड्यांनी वाढली असून सर्व उमेदवारांना यंत्रणेवर अवलंबून राहावे लागणार आहे. राजकीय तणावाचे वातावरण मतदानानंतरही कायम राहणार असून मतमोजणी 21 डिसेंबरला झाल्यानंतरच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
___








