Four black spots reduced in a week; work continues on the remaining route : आठवडाभरात चार ‘ब्लॅक स्पॉट’ कमी; उर्वरित मार्गावर काम सुरू
Pune: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कठोर निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात प्रवण क्षेत्रांवर तातडीने कार्यवाही सुरू झाली आहे. मुंबई – बेंगळुरू (एनएच ४८), पालखी मार्ग (एनएच ९६५) आणि पुणे–नाशिक या तीन प्रमुख महामार्गांवरील एकूण २२ ब्लॅक स्पॉटपैकी चार धोकादायक अपघात स्थळांवरील परिस्थिती सुधारण्यात अभियांत्रिकी पद्धतीने यश मिळाले आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) देण्यात आली. उर्वरित १८ ठिकाणांवर अपघात प्रतिबंधात्मक कामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच संबंधित महामार्गांवर अपघातमुक्त प्रवास शक्य होईल, असा विश्वास एनएचएआयने व्यक्त केला आहे.
अलीकडेच मुंबई–बेंगळुरू महामार्गावरील कात्रज ते नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र चिंता व्यक्त झाली आणि त्याचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटले. यानंतर गडकरी यांनी अधिकाऱ्यांना संपूर्ण राज्यातील ब्लॅक स्पॉट्सवर तात्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यानुसार एनएचएआयने तातडीने सर्वंकष पुनर्मूल्यांकन करत अभियांत्रिकी दुरुस्त्या, रस्त्याची रुंदी वाढवणे, वेग नियंत्रण, यु-टर्न सुधारणा, सिग्नल प्रणाली आणि ट्रॅफिक फ्लो यावर काम सुरू केले.
Indigo crisis : इंडिगो संकट कायम ‘हाहा:कार सुरूच’ प्रवाशांचा संताप वाढला
विशेषतः राष्ट्रीय महामार्ग ९६५ सासवड, जेजुरी आणि नाशिक फाटा ते खेड परिसरात अपघातांचे मूळ कारण शोधण्यासाठी पथक नेमण्यात आले होते. त्यानंतर तीव्र वळण कमी करण्यासाठी रुंदीकरण, रंबल स्ट्रिप्स, वेग मर्यादा चिन्हे, प्रतिबंधात्मक फलक, तसेच धोकादायक यु-टर्न बंद करून पुढे जाऊन वळण व्यवस्था लागू करण्यात आली. खेड मार्गावर पुढील टप्प्यात चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे वाहतुकीचा वेग आणि सुरक्षितता दोन्ही वाढेल. ब्लॅक स्पॉट कमी झाल्यानंतर या ठिकाणांवरील वाहतूक सुरळीत झाल्याचे मान्य करण्यात आले आहे.
भोर फाटा, सासवड फाटा, जेजुरी, लोणंद, मोशी, आळंदी फाटा, चिंबळी फाटा, चाकण MIDC चौक आणि खेड शहर प्रवेशद्वार या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आधीच करण्यात आल्याचे एनएचएआयने स्पष्ट केले आहे. उर्वरित १८ ठिकाणांवरील कामाचा आढावा गडकरी स्वतः घेत असून या प्रकल्पाचा पुढील टप्पा वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दिवस-रात्र काम सुरू आहे.
एकूणच महामार्गावरील मृत्यू आणि भीषण अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर प्रशासन तीव्र गतीने सक्रिय झाले असून आगामी काळात सुरक्षित प्रवास हा शासनाचा मुख्य उद्देश असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
____








