Municipal elections : महानगरपालिका निवडणुका 2025 संदर्भात आज मोठी घोषणा होण्याची शक्यता

Eyes on announcement of State Election Commissions move as soon as session ends : अधिवेशन संपताच राज्य निवडणूक आयोगाची हालचाल घोषणेकडे सर्वांचे लक्ष

Mumbai: राज्यातील रखडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आज महत्त्वाचा दिवस मानला जात आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच राज्य निवडणूक आयोगाने आज, रविवार 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत महानगरपालिका निवडणुका 2025 संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आणि ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. काल राज्याचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या पत्रकार परिषदेनंतरच राज्यात आजपासून आचारसंहिता लागू होणार की नाही, याबाबत स्पष्टता मिळणार आहे.

Girish Mahajan : नदीकाठावरील नागरिकांच्या समस्या वाढल्या, जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात बैठक

राज्यात एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका प्रस्तावित असून त्यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भिवंडी-निजामपूर, बृहन्मुंबई, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा-भाईंदर, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, नवी मुंबई, पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर आणि वसई-विरार या महानगरपालिकांचा समावेश आहे. विशेषतः मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि नागपूर या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

यासोबतच जिल्हा परिषद निवडणुकांबाबतही आजच्या पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्हा परिषदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Local Body Elections : सिंदखेड राजा नगर परिषद निवडणूक ठरली ‘संघर्षाची लढाई’

दरम्यान, आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास तत्काळ आदर्श आचारसंहिता लागू होणार असून त्याचा थेट परिणाम राजकीय पक्षांच्या हालचाली, शासकीय निर्णय आणि विकासकामांवर होणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे राजकीय पक्षांसह प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.