Ajit Pawars urgent meeting with Chief Minister Fadnavis : अजित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांशी तातडीची भेट
Nashik : जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांकडून माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. कोणत्याही क्षणी अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता असून तसे झाल्यास कोकाटे यांची अटक अटळ मानली जात आहे.
आज अटक होण्याची शक्यता असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. काही वेळापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाची सविस्तर माहिती अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगितले जाते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतचा अंतिम निर्णय अजित पवार यांनीच घ्यावा, असे स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे.
Farmers kidney sold : कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा आरोप
ही भेट संपल्यानंतर अजित पवार हे मंत्रालयात नियोजित राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, या बैठकीत कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पक्ष सध्या राजीनाम्याच्या बाजूने नसला तरी अटक वॉरंट निघाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी कोंडी होऊ शकते.
माणिकराव कोकाटे यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातून मिळवल्याचा आरोप आहे. कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चौघांनी ‘माउंट व्ह्यू अपार्टमेंट’मध्ये सदनिका मिळवल्या होत्या. या प्रकरणी तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली होती.
Manikrao Kokate : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम !
प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याने आता कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अशा परिस्थितीत अजित पवार नेमका काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








