change in power equations in Akola–Buldhana–Washim possible : भाजप आघाडीवर, काही ठिकाणी त्रिशंकू, युती–आघाड्यांची भूमिका निर्णायक
Akola आगामी नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेक ठिकाणी सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप बहुतांश नगरपालिकांमध्ये आघाडीवर दिसत असला, तरी काही ठिकाणी काँग्रेस, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी तसेच एमआयएम प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. रविवार हे सर्व चित्र स्पष्ट होईल.
बुलढाणा जिल्हा : भाजपचे वर्चस्व, मात्र काही ठिकाणी युती निर्णायक
बुलढाणा जिल्ह्यात चिखली, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा, खामगाव या नगरपालिकांमध्ये भाजप सत्तेत येण्याची शक्यता असून खामगावमध्ये भाजप २५ पेक्षा अधिक जागा मिळवत भक्कम बहुमत मिळवू शकतो.
बुलढाणा नगरपालिकेत शिंदेसेना सत्ताधारी ठरण्याची शक्यता असून देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप युती सत्तेत येण्याची शक्यता आहे. मेहकरमध्ये उद्धवसेना, तर लोणारमध्ये काँग्रेस सत्तेत येण्याचे संकेत आहेत. मलकापूरमध्येही काँग्रेस मजबूत स्थितीत आहे.
Akola Municipal Corporation : २० वर्षांत पाच महिला महापौर; आता नव्या आरक्षणाकडे लक्ष!
अकोला जिल्हा : काही ठिकाणी त्रिशंकू, काही ठिकाणी महाविकास आघाडी
अकोला जिल्ह्यात अकोट नगरपालिकेत भाजप व काँग्रेस समसमान जागा मिळवत सत्तेसाठी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मूर्तिजापूरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असली, तरी स्पष्ट बहुमतापासून दूर राहू शकतो.
तेल्हारा व हीवरखेड येथे भाजप सत्ताधारी ठरण्याची शक्यता आहे. बाळापूर नगरपालिकेत महाविकास आघाडी सत्तेत येण्याचे संकेत असून नगर विकास व वंचित आघाडीही प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. बार्शीटाकळी नगरपंचायतीत काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन करू शकते.
Municipal Corporation Elections : प्रचाराचे नियम, निवडणूक खर्च अन् आचारसंहिता!
वाशिम जिल्हा : भाजप आघाडीवर, कारंजामध्ये अनिश्चितता
वाशिम नगरपालिकेत भाजपला १९ ते २० जागा मिळून स्पष्ट सत्ता मिळण्याची शक्यता आहे. रिसोडमध्येही भाजप मजबूत स्थितीत आहे. मात्र कारंजा नगरपालिकेत एमआयएम किंवा मिश्र सत्ता येण्याची शक्यता असून येथे स्पष्ट बहुमत कोणालाही मिळण्याची चिन्हे नाहीत. मंगरूळपीर येथे भाजप सत्ताधारी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकूणच तीनही जिल्ह्यांत भाजप सर्वाधिक नगरपालिकांमध्ये आघाडीवर असला, तरी अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांची भूमिका सत्ता स्थापनेसाठी निर्णायक ठरणार आहे. काही नगरपंचायती व नगरपालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून निवडणूक निकालानंतर युती–आघाड्यांचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.








