Raj Thackeray took mic from Uddhav Thackeray and gave a strong reply : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक घेत लगावला टोला
Mumbai: मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा होत असताना पत्रकार परिषदेत एक अनपेक्षित आणि चर्चेचा क्षण पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या विधानावरून विचारलेल्या प्रश्नामुळे वातावरण क्षणभर तापले, मात्र त्यानंतर राज ठाकरेंनी केलेल्या एका मिश्कील पण खोचक वक्तव्याने संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.
आज 24 डिसेंबर रोजी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची अधिकृत घोषणा केली.
यावेळी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा ठाम विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगत आक्रमक भूमिका मांडली. पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या विधानावरून प्रश्न उपस्थित केला. ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असेल, निवडणुकीनंतर त्यांच्या हातात कार्यकर्ते राहणार नाहीत, असे दानवेंनी म्हटले होते. या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता उद्धव ठाकरे यांनी दानवेंवर थेट टीका करत, ते त्या पातळीचे नाहीत, त्यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
Shiv Sena – MNS alliance : शिवसेना – मनसे युतीची अखेर अधिकृत घोषणा
उद्धव ठाकरे उत्तर देत असतानाच बाजूला बसलेले राज ठाकरे अचानक पुढे सरसावले आणि थेट उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक घेतला. त्यानंतर त्यांनी, मला वाटतं उत्तरं देवांना द्यायची असतात, दानवांना नाहीत, असे एकाच वाक्यात सांगत रावसाहेब दानवेंवर खोचक टोला लगावला. राज ठाकरेंच्या या वक्तव्याने संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ उडाला आणि हा क्षण लगेच चर्चेचा विषय ठरला.
यानंतर उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ठळकपणे मांडला. संयुक्त महाराष्ट्र मिळवल्यानंतर मुंबईतच मराठी माणसावर अन्याय सुरू झाला आणि तेव्हा हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला, अशी आठवण त्यांनी करून दिली. अनेक वर्षे परिस्थिती सुरळीत होती, मात्र आता पुन्हा मुंबईचे लचके तोडण्याचे आणि शहराच्या चिंधड्या उडवण्याचे मनसुबे दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी माणसाला उद्देशून त्यांनी तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका, असे आवाहनही केले.
Municipal election : महायुतीत जागावाटपावर हालचाली, अंतिम यादीवर शिक्कामोर्तब
दरम्यान, राज ठाकरे यांनीही युतीमागील भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या विचारातूनच शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जागावाटपाबाबत काहीही जाहीर केले जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल, असा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेतील हा माईकचा क्षण आणि राज ठाकरेंचा एक ओळीतील टोला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीसोबतच या घटनेचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
__








