Two former MLAs face a prestige battle : आघाडीची छत्री उडाली, दोन माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
Buldhana ‘छत्री’ घेऊन १९९५ मध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘घड्याळ’ या चिन्हावर त्यांनी चार वेळा विधानसभा जिंकली; मात्र लोकसभेत दोनदा पराभव स्वीकारावा लागला. २०२४ मध्ये ऐनवेळी फुंकलेली ‘तुतारी’ मात्र वाजली नाही. त्यानंतरची ही त्यांची पहिलीच निवडणूक—देऊळगावराजा नगरपालिकेची.
पक्षाचे विदर्भप्रमुख असले तरी साहेबांचा जीव मतदारसंघातच अधिक. जसा केंद्रीयमंत्री असतानाही प्रतापरावांचा जीव मेहकरमध्ये, तसाच शिंगणे यांचाही सिंदखेडराजात. तिथे ‘तुतारी’ने कशीबशी बाजी मारली; मात्र देऊळगावराजात त्यांनी शिंदेसेनेचे प्रतिनिधी डॉ. शशिकांत खेडेकर यांना सोबत घेत ‘नगर विकास आघाडी’ स्थापन केली. मात्र या दोघांच्या कार्यकाळात शहराचा किती विकास झाला, हा प्रश्न आजही अनुत्तरितच.
E Crop Survey : ई-पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; ऑफलाईन पीक पाहणीची मुभा
आघाडीने ‘लकी’ ठरलेली छत्री निशाणी घेतली खरी; पण ती नेमकी केव्हा आणि कशी उडाली, हे साहेबांनाही कळले नाही. खेडेकर यांची अवस्था तर “खाया-पिया कुछ नही, गिलास फोडा बाराणा” अशीच झाली. आरक्षणामुळे स्वप्न भंगले आणि आता साखरखेर्डा सर्कलवर नजर आहे.
या दोन माजी आमदारांच्या विरोधात ताकदीने उभे राहिले आमदार मनोज कायंदे. नवखे असतानाही उमेदवारांना कसे पाठबळ द्यायचे, याचा धडा त्यांनी अनुभवी नेत्यांना दिला. विधानसभेनंतर नगरपालिकेतही मनोज कायंदे ‘जायंट किलर’ ठरले. ‘किंगमेकर’ची भूमिका संतोष खांदेभराड यांनी बजावली, तर ‘किंगमास्टर’ ठरले अॅड. नाझेर काझी.
देऊळगावराजा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी तुषार शिंपणे नगराध्यक्षपदी निवडून आल्या. त्यांनी नगर विकास आघाडीच्या नेहा बळवंत सुनगत यांचा तब्बल २३६६ मतांनी दणदणीत पराभव केला.
शिंपणे यांना ९९९८, सुनगत यांना ७६२२ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर उबाठा.च्या शोभा कासारे राहिल्या; वंचितच्या पाठिंब्यानंतरही त्यांना ३१६९ मतांवर समाधान मानावे लागले.
विद्याविभूषित माधुरी शिंपणे या खडकपूर्णाचे माजी कार्यकारी अभियंता शिंपणे यांच्या सुनबाई. त्यामुळे प्रशासनाचा अनुभव, साधनसामग्री आणि नियोजन यांचा निवडणूक प्रवाहावर मोठा परिणाम झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत माधुरी शिंपणे यांच्या सासूबाई सौ. शिलाताई शिंपणे या आरक्षित सिंदखेडराजा सर्कलमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. आरक्षणाचा लाभ आधी प्रशासनात आणि नंतर राजकारणात शिंपणे कुटुंबाला पुरेपूर मिळाल्याचे चित्र आहे.
Illegal Sand Mining : रेती तस्करांवर ‘बुलडोझर’; चार बोटी उद्ध्वस्त, ५५ लाखांचा एवज नष्ट
अपात्र अर्जांमुळे निवडणूक २ डिसेंबरवरून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली. या वाढीव कालावधीचा पुरेपूर फायदा राष्ट्रवादी-महायुतीने घेतला. अजित पवारांची सभा, माणिकराव कोकाटे व मुस्लीम मतदारांसाठी सना मलिक यांची सभा—असा माहोल राष्ट्रवादीने उभा केला. भाजपने तीनही जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीने १६ पैकी ९ जागा आणि एका पाठिंब्याच्या जागेसह एकूण १० जागांवर झेंडा फडकावला. महायुतीकडे एकूण १३ जागा गेल्या.
उबाठा.ने १९ जागा लढवून केवळ दोन जागांवर समाधान मानले, तर काँग्रेसने लढविलेल्या तिन्ही जागा गमावल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची अनुपस्थितीही पक्षाला महागात पडली.
२५ वर्षांचे वैर विसरून एका छत्रीखाली आलेले डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर या दोघांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तरुणाईला सोबत घेत मनोज कायंदे यांनी उभा केलेल्या झंझावातात आघाडीची छत्री उडाली आणि राष्ट्रवादीने विजयाचा गुलाल उधळला.








