Tension in Khopoli, mob surrounds police station, demands suspension of sub-inspector : खोपोलीत तणाव, पोलीस ठाण्याला जमावाचा घेराव, सब-इन्स्पेक्टर निलंबनाची मागणी
Raigad : जिल्ह्यातील खोपोली शहरात नगरपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर अवघ्या चार दिवसांत घडलेल्या हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची आज सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. २१ डिसेंबर रोजी नगरपरिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ही घटना घडल्याने शहरात तीव्र तणाव निर्माण झाला असून, राजकीय वातावरणही तापले आहे.
या हत्येनंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसह मोठा जनसमुदाय खोपोली पोलीस ठाण्यात जमा झाला आहे. पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू असून, आरोपींना तात्काळ अटक करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. संतप्त जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला असून, खोपोली शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन हिरे यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल स्वतः उपस्थित राहून जमावाला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसून ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत. मंगेश काळोखे यांनी यापूर्वीच पोलीस ठाण्यात आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती, तरीही पोलिसांनी याची योग्य दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांसह आंदोलकांकडून केला जात आहे.
municipal elections : महाराष्ट्रात दोन नव्हे तर तिसऱ्या आघाडीची नांदी?
मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते. आज सकाळी ते आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे खोपोली शहर हादरून गेले आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपी कोण, याबाबत अद्याप स्पष्टता नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
Maharashtra politics : आयातांचा बोलबाला मात्र निष्ठावंतांची उपेक्षा !
दरम्यान, मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी या हत्येमागे राजकीय वैर असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नगरपरिषदेचा निकाल लागल्यानंतर लगेचच ही हत्या होणे ही दुर्दैवी आणि संशयास्पद बाब असून, यामागे राजकीय कट असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
एकीकडे हत्येचा तपास सुरू असताना, तर दुसरीकडे शहरात निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण आणि पोलीस ठाण्यात सुरू असलेले ठिय्या आंदोलन यामुळे खोपोलीत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. या घटनेचा उलगडा आणि आरोपींची अटक कधी होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
___








