Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance, seal on fighting together : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती, एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब
Akola : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरही एकमत झाले असून या युतीची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून गोंधळ सुरू असतानाच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यावर काँग्रेसने सुरुवातीला स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली होती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नव्या मित्राच्या शोधात होती आणि त्यातूनच वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडीच्या चर्चांना वेग आला.
Municipal election : उमेदवारी अर्जासाठी दोनच दिवस उरले तरी युती-आघाडीचा तिढा कायम
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू होत्या. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना चर्चेचे अधिकार देण्यात आले होते. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी या चर्चांमध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला मुंबई महापालिकेतील काही जागांवरून आघाडीचा तिढा निर्माण झाला होता, मात्र अखेर त्यातून मार्ग काढण्यात यश आले असल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे लढवणार असून वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला सुमारे ६२ जागा येण्याची शक्यता आहे. या आघाडीची औपचारिक घोषणा रविवारी दुपारी करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Nagpur crime : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गंभीर गुन्हा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न अपयशी ठरले होते, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केल्याने त्याचा थेट परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईपुरती ही आघाडी निश्चित झाली असली तरी राज्यातील इतर महापालिकांबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. संबंधित महापालिकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दोन्ही पक्षांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नव्या युतीमुळे राज्यातील महापालिका निवडणुकांमधील राजकीय गणिते बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.








