Payments for operators offering online services remains unpaid : ऑनलाइन सेवा चालविणारे कंगाल, ऑपरेटरचे मानधन रखडले
Buldhana ग्रामपंचायतींमधील विविध ऑनलाइन सेवा सुरळीतपणे चालविणाऱ्या संगणक परिचालकांचे मानधन गेल्या पाच महिन्यांपासून रखडले असून, आधीच अत्यल्प मोबदल्यावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर भीषण आर्थिक संकट ओढावले आहे. किराणा उधारीवर घ्यावा लागत असून, आजारपणात उपचारासाठी उसनवारी किंवा नातेवाइकांकडून पैसे उचलण्याची वेळ आल्याने परिचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये जन्म–मृत्यू नोंदणी, विविध दाखले, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, शासनाच्या योजनांची नोंदणी, तसेच दैनंदिन प्रशासकीय कामे संगणक परिचालकांच्या माध्यमातूनच केली जातात. मात्र, एवढी महत्त्वाची जबाबदारी पार पाडूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
थकीत मानधन मिळावे, यासाठी वेळोवेळी आंदोलने व निवेदने देण्यात आली. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने परिचालकांचा प्रश्न कायम आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून थकीत मानधन अदा करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
Municipal Council Election : एका डॉक्टरला पसंती, वकिलांच्या कुटुंबियांना नाकारले
सण-उत्सवाच्या काळातही हातात पैसा नसल्याने अनेक कुटुंबांना सण साधेपणाने किंवा उदासीन वातावरणात साजरे करावे लागत आहेत. वाढती महागाई, घरभाडे, शिक्षण आणि आरोग्य खर्च भागवताना परिचालकांची मोठी कसरत होत आहे.
घरातील किराणा उधारीवर घ्यावा लागत असून, आजारपणात उपचारासाठी नातेवाईक किंवा सावकारांकडून पैसे उचलण्याची वेळ येत आहे. यामुळे आर्थिकच नव्हे, तर मानसिक तणावातही मोठी वाढ झाली आहे. जिल्हाभरात तब्बल ७४७ संगणक परिचालक कार्यरत असून, मानधन रखडल्यामुळे बहुसंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांनी उसनवारीचा मार्ग स्वीकारला आहे.
मानधन न मिळाल्याने काही जिल्ह्यांत संगणक परिचालकांनी काम बंद ठेवले असताना, बुलढाणा जिल्ह्यातील परिचालकांनी मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मानधन रखडले असतानाही सेवा सुरू ठेवली आहे. ही बाब त्यांच्या प्रामाणिकपणाचे उदाहरण ठरत आहे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, अमरावतीत महायुतीच लढणार
‘आधीच तुटपुंजे मानधन, तेही वेळेवर नाही’
संगणक परिचालकांना मिळणारे मानधन अत्यल्प असून, त्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. त्यात पाच महिन्यांपासून मोबदला न मिळाल्याने आर्थिक गणिते पूर्णपणे कोलमडली आहेत.
“संगणक परिचालक शासनाची अत्यंत महत्त्वाची कामे प्रामाणिकपणे पार पाडतात. मात्र, मानधन वेळेवर न मिळाल्याने कुटुंब जगवणे कठीण झाले आहे. थकीत मानधन तातडीने अदा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असे संगणक परिचालक संघटनेने स्पष्ट केले आहे.








