BJP’s big decision against dynastic rule : भाजपचा घराणेशाहीविरोधात मोठा निर्णय
Mumbai : महापालिका निवडणुकांसाठी भाजपने घराणेशाहीला छेद देणारा मोठा आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबीयांना म्हणजेच मुलगा, मुलगी किंवा पत्नी यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आज जाहीर होणाऱ्या भाजपच्या उमेदवार यादीत कोणत्याही आमदार, खासदार किंवा मंत्र्याच्या घरातील व्यक्तीला तिकीट देण्यात आलेले नाही.
नगरपालिका निवडणुकांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांना तिकीट देण्यावरून टीकेचा सामना करणाऱ्या भाजपने आता महापालिका निवडणुकांसाठी पूर्णपणे वेगळा पॅटर्न स्वीकारला आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि पक्षात नव्या नेतृत्वाची फळी तयार व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे ज्या प्रभागांमधून आमदार-खासदारांच्या मुलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्या ठिकाणी तात्काळ माघार घेण्यात आली आहे.
Banner war: भाजपच्या ‘नमो भारत, नमो ठाणे’ला मनसेचे ‘मौन भारत, मौन ठाणे’ ने उत्तर
नाशिकमध्ये या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम पाहायला मिळाला. आमदार सीमा हिरे आणि आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या मुलांचे उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलानेही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तो अर्जही मागे घेण्यात आला आहे. कृष्णराज महाडिक यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र राज्य पातळीवर आमदार- खासदारांच्या घरात उमेदवारी न देण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. आम्ही पक्षाचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत, असे स्पष्ट करत खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपच्या निर्णयाची माहिती दिली.
भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलाने नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असून, पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. पक्षाच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया देवयानी फरांदे यांनी दिली आहे. आमदार सीमा हिरे यांची मुलगीही नाशिक महापालिका निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.
दरम्यान, या निर्णयाला अपवाद म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भाऊ आणि वहिनीला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले असले तरी भाजप नेतृत्वाने घराणेशाहीविरोधातील निर्णयावर ठाम भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, हेही उघड झाले आहे. मात्र, ही नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. दोन दिवसांत नाराजांची समजूत काढू, महायुतीची सांगड घालताना काहींवर अन्याय झाला हे मान्य आहे, पण सर्वांना विश्वासात घेऊ, असे महाडिक यांनी स्पष्ट केले. धनश्री तोडकर यांचीही भेट घेऊन नाराजी दूर केली जाईल, तसेच काँग्रेसचे अनेक इच्छुक संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, भाजपची उमेदवार यादी अंतिम असून त्यात कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.








