87 Councillors to Be Elected from 22 Wards in Amravati : अमरावतीतील २२ प्रभागांमधून ८७ नगरसेवक निवडले जाणार
Amravati अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता सर्वच प्रमुख राजकीय पक्ष जाहीरनामे प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. अमरावतीतील २२ प्रभागांमधून ८७ नगरसेवक निवडले जाणार असून, यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ३ जानेवारी रोजी चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे.
भाजपच्या जाहीरनाम्याची जबाबदारी प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्याकडे असून, काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे काम प्रदेश प्रवक्ते व माजी महापौर मिलिंद चिमोटे पाहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर ॲड. किशोर शेळके यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. शिवसेना (उबाठा गट) जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा तयार करण्यात आला असून, शिवसेना (शिंदे गट) कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्याकडे जाहीरनाम्याची सूत्रे आहेत.
Mohan Bhagwat : लव्ह जिहाद कसा थांबवणार? मोहन भागवतांचा स्पष्ट मंत्र!
भाजपने केंद्र व राज्य सरकारच्या धर्तीवर ‘विकसित अमरावती – सुरक्षित अमरावती’ हा मुद्दा जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी ठेवला आहे. शहराचा सर्वांगीण आणि वेगवान विकास करताना नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प भाजपने केला आहे. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्याने अमरावतीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार वर्षांत मनपामध्ये प्रशासकीय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केंद्र व राज्यात एकसुरी सत्ता असल्याने तत्कालीन सत्ताधाऱ्यांची या भ्रष्टाचाराला मूक संमती होती. कचरा संकलन अनियमित आहे, तसेच करवाढ रद्द करण्याची स्थगिती प्रशासनाने नकळतपणे उठवली, हे मुद्दे काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात मांडणार आहे. तसेच रेल्वे स्टेशन विक्रीला काढण्याचा भाजपचा डाव काँग्रेसने हाणून पाडल्याचा दावाही करण्यात आला आहे.
Municipal election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात, भाजपची विजय संकल्प रॅली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शहराचे माजी महापौर ॲड. किशोर शेळके यांनी सांगितले की, जाहीरनामा हा पक्ष आणि जनतेमधील करार असतो. यापूर्वी सत्तेत असताना दिलेले सुशासन यावेळीही दिले जाईल. त्या काळात केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली जातील. जिल्ह्यात पक्षाचे दोन आमदार, राज्य सत्तेतील सहभाग आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे असलेली राज्याच्या तिजोरीची ‘चावी’ या बाबी अमरावतीकरांच्या हिताच्या ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना (उबाठा गट) जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी आरोप केला की, सत्ताधाऱ्यांकडून शहरातील मैदाने गिळंकृत केली जात आहेत. याला आळा घालण्याचे काम शिवसेना करेल. पार्किंग झोन, हॉकर्स झोन आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर जनतेचा कौल मिळवला जाईल, असे त्यांनी सांगितले. शिवसेना (शिंदे गट) कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या मते, त्यांचा जाहीरनामा अंतिम टप्प्यात असून ६ जानेवारीनंतर तो अमरावतीकरांसमोर मांडण्यात येणार आहे.








