Controversy erupts over statement by Shivsena leader Shrikant Deshpande : शिवसेना नेते श्रीकांत देशपांडे यांच्या वक्तव्याने वाद
Akola ज्येष्ठ नागरिकांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिवसेना (शिंदे गट) चे अकोला महापालिका निवडणूक निरीक्षक व माजी आमदार श्रीकांत देशपांडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना काम नसते, ते दिवसभर रिकामे असतात, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन प्रचार करा, असा सल्ला त्यांनी शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवारांना दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अकोल्यातील एका हॉटेलमध्ये शनिवारी शिवसेना (शिंदे गट) च्या महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला पूर्व विभागाचे निरीक्षक श्रीकांत देशपांडे, पश्चिम विभागाचे निरीक्षक व माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेत एकूण ७२ उमेदवार सहभागी झाले होते.
वक्तव्य ठरले अपमानास्पद
प्रचाराचे तंत्र समजावून सांगताना देशपांडे यांनी उमेदवारांना प्रचारात कोणाला सोबत घ्यावे, याचे नियोजन करण्याचा सल्ला दिला. यावेळी बोलताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभव आणि शहाणपण असते; मात्र त्यांना काम नसते, ते दिवसभर घरीच असतात. त्यामुळे त्यांना काका, नाना म्हणून प्रचारात सोबत घ्या, असे वक्तव्य केल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
Akola Municipal Corporation : अकोल्यात भाजप-शिंदेसेना युती का फिसकटली?
या वक्तव्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काम नसलेले, रिकामे ठरवणे हे अपमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेकांनी हे विधान वयभेद करणारे आणि ज्येष्ठांचा अवमान करणारे असल्याची टीका केली आहे. आजही ज्येष्ठ नागरिक विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना, अशा प्रकारचे विधान एका जबाबदार राजकीय नेत्याकडून होणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Akola Municipal Corporation : अकोल्यात ४६९ उमेदवार आजमावणार नशीब, अंतिम यादी जाहीर
पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष
व्हायरल व्हिडीओनंतर शिवसेना (शिंदे गट) च्या अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पक्षाकडून या वक्तव्याबाबत खुलासा किंवा कारवाई केली जाणार का, याबाबत उत्सुकता आहे. एकीकडे ज्येष्ठ मतदारांचा सन्मान करण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे त्यांनाच रिकामे ठरवणारी वक्तव्ये केल्याने विरोधाभास निर्माण झाला आहे.
देशपांडे यांचा खुलासा
दरम्यान, उमेदवारांना संबोधित करताना श्रीकांत देशपांडे यांनी, प्रचारात कोणासोबत फिरता याचे भान ठेवा. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव व मार्गदर्शन प्रचारासाठी उपयोगी ठरते. माझ्या मनात नेहमीच ज्येष्ठ नागरिकांविषयी सन्मान आहे. बोलण्यामागचा उद्देशही तोच होता, असा खुलासा केल्याचे सांगितले आहे.








