Family politics in full swing in Pune Municipal Corporation elections: पुणे महापालिका निवडणुकीत कुटुंबराजकारण जोरात
Pune: पुणे महापालिका निवडणुकीत यंदा कुटुंबातील सदस्य एकमेकांसमोर किंवा वेगवेगळ्या प्रभागांतून निवडणूक लढवत असल्याचे चित्र ठळकपणे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये फूट पडून त्यांचे चार स्वतंत्र गट तयार झाल्याने राजकीय पक्षांची संख्या वाढली, मात्र सक्षम आणि विश्वासार्ह उमेदवारांची कमतरता जवळपास सर्वच पक्षांना भासू लागली. याच पार्श्वभूमीवर एकाच घरातून दोन-दोन उमेदवारी देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
पती-पत्नी, नणंद-भावजय, आई-मुलगा, वडील-मुलगा, भाऊ-भाऊ, मामा-भाचे आणि सासरा-जावई अशा १२ हून अधिक नातेसंबंधातील जोड्या विविध पक्षांच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काही ठिकाणी या जोड्या एकाच प्रभागात आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागांतून महापालिकेत पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहेत.
Municipal election : मतचोरी, ईव्हीएम घोटाळा आणि प्रशासकीय भ्रष्टाचारावर गंभीर आरोप
गेल्या तीन वर्षांत राज्यातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि निवडणुकीत पक्षांची संख्या वाढली. मात्र या बदलांमुळे अनुभवी आणि जनाधार असलेले उमेदवार शोधणे सर्वच पक्षांसाठी आव्हान ठरले. परिणामी, कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी देण्याकडे सर्वच पक्षांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात थेट दोन दाम्पत्यांना उमेदवारी दिली आहे. विमाननगर-लोहगाव प्रभागातून सुरेंद्र पठारे आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे निवडणूक लढवत आहेत. तर येरवडा-गांधीनगर आणि पुणे स्थानक-जय जवाननगर या प्रभागांतून अनुक्रमे संजय भोसले आणि अश्विनी भोसले हे दाम्पत्य भाजपकडून रिंगणात उतरले आहे. काँग्रेसकडून कासेवाडी-डायसप्लॉट प्रभागात अविनाश बागवे आणि इंदिरा बागवे हे पती-पत्नी निवडणूक लढवत आहेत.
सनसिटी-माणिकबाग प्रभागात निवडणूक आणखीच वेगळी ठरली आहे. येथे सर्वसाधारण गटातून भाजपचे सचिन मोरे आणि काँग्रेसचे घनंजय पाटील हे केवळ दोनच उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागातील उर्वरित दोन जागा बिनविरोध झाल्या असून त्या भाजपकडे गेल्या आहेत. सर्वात कमी उमेदवार असलेली ही एकमेव लढत ठरली आहे.
काही प्रभागांमध्ये नात्यातील सदस्य थेट एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा प्रभागातून सुनील ऊर्फ बंडू गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर उमेश गायकवाड हे भाजपकडून निवडणूक लढवत असून हे चुलते-पुतणे यंदा आमनेसामने आले आहेत. याच प्रभागात हिमाली कांबळे भाजपकडून आणि सुमन गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असल्याने नातेसंबंधातील राजकीय संघर्ष अधिकच वाढला आहे.
Municipal elections : निवडणुकीत महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश–बिहार झाला
आई-मुलगा, भाऊ-भाऊ आणि बाप-लेक अशा अनेक जोड्याही निवडणुकीत सक्रिय आहेत. काही ठिकाणी हे नातेवाईक एकाच पक्षातून, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक लढवत असल्याने मतदारांसमोर वेगळेच राजकीय चित्र उभे राहिले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत यंदा वाढलेले कुटुंबराजकारण आणि एकाच घरातील अनेक उमेदवार हे सक्षम उमेदवारांच्या टंचाईचे प्रतीक मानले जात असून, या पार्श्वभूमीवर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








