Akola Municipal Corporation Election : यंदा प्रथमच सहा ठिकाणी मनपा निवडणुकीची मतमोजणी

Civic Election Vote Counting at Six Locations : ईव्हीएमसाठी स्ट्राँगरूम निश्चित; १६ जानेवारी रोजी निकाल

Akola येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी होणार आहे. यंदा निवडणूक निकालानंतर होणारी गर्दी व त्यातून उद्भवणारे वाद लक्षात घेता प्रथमच सहा ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशासनालाही यासाठी विशेष जुळवाजुळव करावी लागणार आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्षांकडून जाहीर प्रचार सुरू आहे. दरम्यान, निवडणूक विभागाकडून मतदान व मतमोजणी प्रक्रियेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या २० प्रभागांतील ८० जागांसाठी ही निवडणूक होत असून ४६९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने नागरिकांना ईव्हीएमवरील चार बटणे दाबणे आवश्यक आहे. मतमोजणीच्या दिवशी प्रथम पोस्टल मतांची, त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे.

Dhananjay Munde : कामगाराच्या अपघाती मृत्यूने मुंडे कळवळले, पण…

प्रभागनिहाय मतमोजणी केंद्रे
प्रभाग १, २ व ७ : शासकीय धान्य गोदाम, जिल्हाधिकारी कार्यालय
प्रभाग ३, ४, ५ व ६ : अकोला जिल्हा मराठा मंडळ, रामदासपेठ
प्रभाग ८, ९, १० व १७ : नीमवाडी पोलीस वसाहत येथील मल्टीपर्पज हॉल
प्रभाग ११, १२ व १८ : राजमाता जिजाऊ अभियंता प्रशिक्षण केंद्र, रेल्वे स्टेशनजवळ
प्रभाग १३, १४ व १५ : जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, सिव्हिल लाईन चौक
प्रभाग १६, १९ व २० : शासकीय धान्य गोदाम, खदान, मंगरूळपीर रोड

निवडणूक विभागाने प्रथमच सहा ठिकाणी मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला असून सहा निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचे दोन वेळा प्रशिक्षणही घेण्यात आले आहे.

Santosh Dhuri : ‘मी नाराज नाही, फक्त फडणविसांना भेटून आलो’

ईव्हीएम ज्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत, त्याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे प्रमुख अनिल बिडवे यांनी दिली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी मतमोजणी केंद्रांची पाहणी केली आहे. यापूर्वी एकाच ठिकाणी मतमोजणी होत असली तरी, होणारी गर्दी व त्यातून उद्भवणारे वाद लक्षात घेता यंदा सहा वेगवेगळी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.