Municipal elections : भाजप – एमआयएम युतीचा राजकीय स्फोट, ‘पार्टी विथ डिफरंस’चा दावा ?

Shocking equation for power in Akot Municipal Corporation : अकोट महानगरपालिकेतील सत्तेसाठी धक्कादायक समीकरण

Akola : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी आणि अनेकांना धक्का देणारी घडामोड अकोट नगरपालिकेत घडली आहे. स्वतःला ‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणवणाऱ्या भाजपने सत्तेसाठी थेट असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबत युती करत नवे राजकीय समीकरण उभे केले आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत आघाडी करून सत्तास्थापनेची तयारी केली आहे.

नुकत्याच झालेल्या अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या असल्या, तरी भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नव्हते. 35 सदस्यांच्या नगरपालिकेपैकी 33 जागांची निवडणूक झाली असून भाजपला केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागले. बहुमतासाठी आवश्यक संख्येअभावी भाजपने आता विविध पक्षांना एकत्र आणत ‘अकोट विकास मंच’ या नव्या आघाडीची स्थापना केली आहे.

Food & Drugs department : रेशनच्या ‘निकृष्ट’ धान्यावरून रणकंदन; युवा सेनेचा आठ तास ठिय्या

या ‘अकोट विकास मंचा’मध्ये भाजपनंतर सर्वाधिक पाच नगरसेवक असलेला एमआयएम हा प्रमुख मित्रपक्ष ठरला आहे. याशिवाय या आघाडीत शिंदे गटाची शिवसेना, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष यांचाही समावेश आहे. या नव्या आघाडीची अधिकृत नोंदणी नुकतीच अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

भाजपचे नगरसेवक रवि ठाकूर हे या आघाडीचे गटनेते असणार असून, आघाडीतील सर्व नगरसेवकांना भाजपचा व्हिप पाळणे बंधनकारक असणार आहे. येत्या 13 जानेवारीला होणाऱ्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करणार आहे. सध्या निवडून आलेल्या 33 सदस्यांपैकी या आघाडीला 25 नगरसेवकांचा पाठिंबा असून नगराध्यक्षा माया धुळे यांची गणना केल्यास सत्ताधारी गटाची संख्या 26 वर पोहोचते. त्यामुळे अकोट नगरपालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली स्थिर सत्ता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक विरोधी बाकावर बसणार आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या फिरोजाबी सिकंदर राणा यांचा तब्बल 5271 मतांनी पराभव केला होता. मात्र निवडणूक संपताच सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

BJP Malkapur : पराभूत उमेदवारांना सक्रीय राहण्यासाठी नेत्यांचे साकडे

विधानसभा निवडणुकांमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे आक्रमक नारे देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट एमआयएमसोबत हातमिळवणी केल्याने विरोधकांकडून तीव्र टीका होण्याची शक्यता आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबत युती करून शिंदे गटाला धक्का दिल्यानंतर अकोटमधील भाजप–एमआयएम आघाडीमुळे भाजपच्या राजकीय भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सत्तेसाठी भाजपने सर्व तत्व बाजूला ठेवलीत का, असा सवाल आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.