Bmc election : राहुल नार्वेकरांवर धमकीचे आरोप; ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद,

Political earthquake in Ward No. 226 in Mumbai : मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये राजकीय भूकंप

Mumbai: मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या रणधुमाळीत कुलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 226 राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धमकावल्याचा आरोप करणाऱ्या अपक्ष उमेदवार तेजल पवार यांच्या पाठीशी आता ठाकरे बंधूंसह जवळपास सर्व प्रमुख राजकीय पक्ष एकवटले असून, या वॉर्डमधील लढत प्रतिष्ठेची आणि अत्यंत चुरशीची बनली आहे.

वॉर्ड क्रमांक 226 मधून भाजपकडून मकरंद नार्वेकर रिंगणात असून ते राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत. याच पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार तेजल पवार यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी आपल्याला धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप राहुल नार्वेकर यांच्यावर केला होता. नामांकन मागे घेतले नाही तर तडीपार करण्याची धमकी देण्यात आली, तसेच 10 लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Bmc election : मुंबई आणि मराठी अस्मितेचा ‘डेथ वॉरंट’ निघाल्याचा आरोप

या आरोपांना प्रत्युत्तर देताना राहुल नार्वेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत उलट तेजल पवार यांच्यावरच गंभीर आरोप केले. उमेदवारी मागे घेण्यासाठी तेजल पवार यांचे पती दीपक पवार यांनी 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आपण तेजल पवार यांना ओळखतही नसल्याचे सांगत संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण दिले. मात्र या दाव्यावरही संशय व्यक्त केला जात असून, पाच दिवसांनी असा आरोप का करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या सगळ्या घडामोडींनंतर वॉर्ड क्रमांक 226 मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांना रोखण्यासाठी मनसे, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडी हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. तेजल पवार यांना मनसेने अधिकृत पुरस्कृत केले असून शिवसेना ठाकरे गटाने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्ष असलेल्या तेजल पवार या आता सर्वपक्षीय उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत.

काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत तेजल पवार यांनी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्यावर आरोपांची पुनरावृत्ती केली. त्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत तेजल पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली. सध्या तेजल पवार यांचा प्रचार जोमात सुरू असून त्यांचा प्रचार रथ विशेष लक्ष वेधून घेत आहे. या रथावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार, सोनिया गांधी, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

Municipal elections : बावनकुळे यांच्या समोरच ‘एबी फार्म चोर’, ‘२०० युनिट चोर’च्या घोषणां

दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्या 5 कोटींच्या मागणीच्या आरोपावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हरिभाऊ राठोड यांनी नार्वेकर यांच्या वक्तव्यावर पलटवार करत हे संपूर्ण प्रकरण ‘फेक नरेटिव्ह’ असल्याचा आरोप केला आहे. अपक्ष उमेदवारावर आरोप करण्यासाठी पाच दिवस लागणे यावरूनच सत्ताधाऱ्यांची अडचण स्पष्ट होते, असा दावा त्यांनी केला.

वॉर्ड क्रमांक 226 मध्ये घडलेल्या या घटनांमुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांच्यासाठी ही लढत आता सोपी राहिलेली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.