Decision in view of growing public outrage and party disrepute, is mistake again : वाढता जनआक्रोश आणि पक्षाची बदनामी पाहता निर्णय, भाजपची पुन्हा नाचक्की
Thane : बदलापूरमधील बहुचर्चित बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आणि कुळगाव – बदलापूर नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरोपी असतानाही स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याने भाजपवर तीव्र टीका होत असतानाच, वाढता जनआक्रोश आणि पक्षाची बदनामी लक्षात घेऊन आपटेंनी वरिष्ठांच्या आदेशानंतर राजीनामा सादर केल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, एका दिवसापूर्वीच कुळगाव – बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्तीनंतर समाजातील विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला सन्मानाचे राजकीय पद देण्यात आल्याने नागरिकांसह विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.
Municipal Election: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद !
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी भाजपने तातडीने तुषार आपटे यांचा राजीनामा घेतला नाही, तर 13 किंवा 14 जानेवारी रोजी बदलापूरमध्ये मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर राजकीय दबाव अधिक वाढला. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर टीका करत लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला बक्षीस दिले आहे का, असा सवाल उपस्थित केला होता.
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात तुषार आपटे हे सहआरोपी असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. तरीही त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी पसरली होती. ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा वाद उफाळून आल्याने भाजपची मोठी नाचक्की झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. अखेर पक्षाची प्रतिमा धोक्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तुषार आपटे यांनी स्वतःहून राजीनामा दिला.
आपटेंनी दिलेल्या राजीनामापत्रात, मी विनंतीपूर्वक अर्ज करतो की, माझी कुळगाव- बदलापूर नगरपरिषद स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मी आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी या पदाचा स्वखुशीने राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा, असा आशय नमूद करण्यात आला आहे.
दरम्यान, याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक करण्यात आल्याबाबत विचारले असता, ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. निष्पक्षपणे कारवाई होईल, चिंता करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच तुषार आपटे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याने भाजपने नुकसान टाळण्यासाठी उचललेले पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे.
_








