PMC Election : गुन्हेगारी संपवायची भाषा आणि गुन्हेगारांना उमेदवारी ही विसंगती

Devendra Fadnavis public criticism of DCM Ajit Pawar in backdrop of elections : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जाहीर टीका

Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना महायुतीतील घटक पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोपांची धार वाढल्याचे चित्र आहे. एकाच सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आल्याचे दिसून येत आहे. पुण्यात भाजपावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.

पुण्यात आयोजित एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. गुन्हेगारी संपवण्याची भाषा करणाऱ्यांनीच निवडणुकीत गुन्हेगारांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना तिकीट देणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले. गुन्हेगारी विरोधात बोलायचे आणि दुसरीकडे गुन्हेगारीशी संबंधित लोकांना उमेदवारी द्यायची, या भूमिकेला कोणताही अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांची बैलबंडीवर मिरवणूक आणि लाडू तुला

या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी गालिबच्या शेरचा उल्लेख करत टीका केली. ‘उम्र भर गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और मैं आइना साफ करता रहा’ असे म्हणत खरी समस्या सोडून केवळ दिखाव्यावर भर दिला जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. गुन्हेगार निवडून आले तरी ते गुन्हेगारच राहतात आणि अशा लोकांची जागा महानगरपालिकेत नसून जेलमध्येच असावी, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी मांडले.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गजानन मारणे यांची पत्नी जयश्री मारणे, बंडू आंदेकर यांच्या स्नुषा सोनाली आंदेकर आणि भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना उमेदवारी दिली आहे. यापैकी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या दोघी सध्या कारागृहातून निवडणूक लढवत असल्याने राज्याच्या राजकारणात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याचा ठपका ठेवत अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका मांडली होती. कोणी गुन्हेगार असल्यास त्याच्या पत्नी किंवा कुटुंबीयांचा दोष काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आपण थेट गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली नसून आघाडीतील घटक पक्षांशी केलेल्या जागावाटपानुसार उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट यांच्यात महापालिका निवडणुकीसाठी आघाडी असून, त्या अनुषंगाने काही जागा देण्यात आल्या असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले होते.

Asaduddin Owaisi : ‘डरेगे तो मरेंगे!’; अमरावतीत ओवेसींचा मतदारांना इशारा

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या जाहीर टीकेमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा उघडपणे समोर आले असून पुणे महापालिका निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता राज्यस्तरीय सत्तासंघर्षाचे प्रतिबिंब बनत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.