BJP burns Congress and Maha Vikas Aghadi’s letter : जिल्ह्यातील ९८ ठिकाणी तीव्र निदर्शने, महिलांचा मोठा सहभाग
Akola मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अकोल्यात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि महाविकास आघाडीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या योजनेला न्यायालयात आव्हान देऊन आणि निवडणूक आयोगाकडे तक्रारी करून महिलांच्या हक्काचे पैसे रोखल्याचा आरोप करत भाजपने सोमवारी जिल्ह्याभरात काँग्रेसच्या पत्राची होळी केली. संक्रांतीच्या सणाला लाडक्या बहिणींना मिळणारे ३ हजार रुपये रोखण्यासाठी विरोधकांनी हे पाऊल उचलल्याची टीका भाजप नेत्यांनी यावेळी केली.
भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरातील ८० आणि ग्रामीण भागातील १८ अशा एकूण ९८ ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्यांनी असा दावा केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जात-पात आणि धर्म न पाहता महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली आहे. मात्र, काँग्रेस, उबाठा सेना आणि महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच या योजनेत तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे निर्माण केले आहेत. सणासुदीच्या काळात महिलांच्या खात्यात जमा होणारी रक्कम थांबवण्यासाठी विरोधकांनी जाणीवपूर्वक न्यायालयात धाव घेतल्याचे भाजपने म्हटले आहे.
Asaduddin Owaisi : ओवेसींच्या दोन सभांनंतर एआयएमआयएम आक्रमक; काँग्रेसची पारंपरिक मते धोक्यात!
या निषेध आंदोलनात खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा जाहीर निषेध केला. “महिलांच्या हिताच्या योजनांना विरोध करणाऱ्या शक्तींना आगामी निवडणुकीत धडा शिकवला जाईल,” असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी दिला.
Akash Fundkar : कामगार कल्याणावर विरोधकांचा दुटप्पीपणा; भाजप–राष्ट्रवादी युतीला विजयी करा
महानगरपालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारीला होत असून, त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने भाजपला महिला मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, विरोधकांनी हे आरोप फेटाळून लावत भाजप केवळ राजकारण करत असल्याचा दावा केला आहे. मात्र, पत्राची होळी करून भाजपने अकोल्यात महाविकास आघाडीविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असून, याचा परिणाम मतदानावर कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.








