Calling BJP as dacoits and Congress as thieves, call for complete end to their rule! : भाजपाला डाकू तर काँग्रेसला भुरटे चोर म्हणत सत्तेला पूर्णविराम देण्याचे आवाहन!
Akola: अकोल्यातील शिवणी गावात झालेल्या जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर जोरदार शब्दांत टीका केली. आपल्या आक्रमक भाषणातून त्यांनी भाजपाला थेट डाकू, तर काँग्रेसला भुरटे चोर असे संबोधत राज्यातील राजकीय वातावरण तापवले. या सभेनंतर प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्याची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारा आहे. कुठे दुकानातील सामान चोरणे, कुठे पैसे लंपास करणे, असे प्रकार करणारे हे भुरटे चोर आहेत. मात्र भाजपवाले हे भुरटे नसून थेट डाकू आहेत. भाजप सत्तेत आला की तो संपूर्ण दुकानच लुटून नेतो आणि मागे काहीही शिल्लक ठेवत नाही, असा घणाघात त्यांनी केला. त्यामुळे या डाकूंच्या सत्तेला पूर्णविराम देण्याची वेळ आली असून, तो पूर्णविराम जनता घालू शकते, असे आवाहन त्यांनी केले.
भाजप सत्तेत राहिली तर लोकशाहीच धोक्यात येईल, असा गंभीर इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला. पोलिस खात्यामध्येच चर्चा सुरू आहे की ही कदाचित शेवटची निवडणूक ठरू शकते, असा दावा त्यांनी केला. तुम्हाला हीच शेवटची निवडणूक हवी आहे का, असा थेट प्रश्न त्यांनी सभेला उपस्थित जनतेला विचारला. यावर उपस्थितांनी जोरदार ‘नाही’ असा प्रतिसाद दिल्यानंतर भाजपचे कंबरडे मोडल्याशिवाय त्यांचा सत्तेत जाण्याचा मार्ग बंद होणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात सरकारकडूनच गुंडगिरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. अकोल्यात मतदारसंघांचे आणि प्रभागांचे फेररचना मुद्दाम बदलण्यात आल्याचा दावा करत, ही प्रक्रिया सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एमआयएमची भाजपासोबत झालेली युती मुस्लिम समाजाला मान्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
Rahul Narvekar : व्हिडिओ क्लिपमध्ये दबावाचे पुरावे नाहीत, राहुल नार्वेकर यांना ‘क्लीनचिट’?
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या या सभेत प्रकाश आंबेडकरांनी अत्यंत तीव्र भाषेत भाजपवर हल्ला चढवला. भाजपाला डाकू ठरवत त्यांनी थेट जनतेला आवाहन केल्याने, येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.








