BMC Election 2026 : मतदान करून परतलेल्या मतदारांच्या बोटावरील शाई पुसली गेली

Shocking incident causes stir; Commissioner admits: धक्कादायक प्रकारामुळे खळबळ; आयुक्तांनी दिली कबुली

Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान करून बाहेर पडलेल्या काही मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांकडून आधीपासूनच राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर संशय व्यक्त केला जात असताना हा प्रकार समोर आल्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी मार्करने खूण करण्यात येत आहे. मात्र, या मार्करची खूण बोटावरून पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही मतदारांनी मतदान करून बाहेर आल्यानंतर त्यांच्या बोटावरील निशाणी नखावरून सहज निघून जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी फक्त नखावरील मार्करची खूण पुसली जात असल्याची कबुली दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की बोटावर पूर्णपणे खूण जाते, मात्र नखावर लावलेली मार्करची शाई काही वेळात पुसली जाऊ शकते.

Municipal Election: महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू !

मुंबईपुरतेच नव्हे तर कोल्हापूरमधील कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूल येथील मतदान केंद्रावरही काही मतदारांच्या हातावरील शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे हा मुद्दा राज्यभर चर्चेचा विषय ठरला असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा मार्कर 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरात असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात मतदानानंतर खूण टिकत नसल्याचे प्रकार समोर आल्याने या निर्णयावर टीका होत आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेल्या काही निर्णयांमुळे आधीच वाद निर्माण झाला आहे. PADU नावाचे नवीन मशीन निवडणूक प्रक्रियेत आणण्यात आले असून प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट असे त्याचे नाव आहे. मुंबईतील काही वॉर्डमध्ये ईव्हीएम बॅकअप म्हणून हे मशीन वापरले जाणार आहे. याबाबत आधी कोणतीही माहिती न दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आले नव्हते, मग निवडणूक आयोगाने अचानक हा निर्णय का घेतला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यासोबतच मतदानाच्या दिवशीच राज्य निवडणूक आयोगाने माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्राच्या आत प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतल्यानेही वाद निर्माण झाला आहे. मतदानाच्या ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका होत आहे.

Municipal Election: मतदानापूर्वी शहरात पैशांचा पाऊस, सकाळी चार वाजेपर्यंत फोन आले

दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतचे मतदानाचे प्राथमिक आकडे समोर आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.98 टक्के मतदान झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 7 ते 8 या एका तासात अंदाजे 7 ते 8 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. पुण्यात पहिल्या दोन तासांत केवळ 5.5 टक्के मतदान झाले आहे. सोलापूरमध्ये सकाळी 7.30 ते 9.30 दरम्यान 6.86 टक्के मतदान झाले असून सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत 6.45 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. परभणी शहर महापालिकेसाठी सकाळच्या दोन तासांत 9.10 टक्के मतदान झाले असून मालेगाव महापालिकेत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 11.09 टक्के मतदान नोंदवले गेले आहे.

मतदानाच्या पहिल्याच तासांत समोर आलेल्या या प्रकारांमुळे राज्यातील महापालिका निवडणूक प्रक्रियेभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.