Ambadas Danve serious allegations against BJP : अंबादास दानवे यांचा भाजपवर गंभीर आरोप
Chhatrapati Sambhajinagar : महापालिका निवडणूक 2026 साठी आज राज्यातील 29 महापालिकांमध्ये मतदान होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या मतदार यादीनुसार 11 लाख 18 हजार 263 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र, मतदानाला काही तास शिल्लक असतानाच शहरातील काही भागांत कथित पैसे वाटपाच्या आरोपांमुळे वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. आज मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, त्यांनी सर्वात आधी मतदान केले असून त्यांचे मतदान हे निष्ठेचे आणि संघर्षाचे आहे. मात्र, सकाळी चार वाजेपर्यंत त्यांना फोन येत होते आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पाडल्याची माहिती दिली जात होती, असा दावा त्यांनी केला.
BMC Election 2026 : आधी PADU मशीनचा गोंधळ, आता मतदान केंद्राच्या आत माध्यमांवर बंदी
भारतीय जनता पार्टीला पैशाची मस्ती आणि पैशाचा माज आला आहे, असा आरोप करत दानवे म्हणाले की, भाजपचे नेते विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारतात, मग विकासाच्या नावावर मत मागण्याऐवजी पैशांचा पाऊस का पाडावा लागतो, हा प्रश्न आहे. मतदान हे कामाच्या आधारावर मागितले पाहिजे, पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. जनता सुज्ञ असून जनता निश्चितपणे भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अंबादास दानवे यांनी निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोग कुंभकर्णाची झोप घेत आहे. निवडणूक आयोग प्रक्रियेत कुठेच दिसत नाही. एकांगी पद्धतीने, प्रशासनाच्या दबावाखाली एका बाजूला एक न्याय आणि दुसऱ्या बाजूला दुसरा न्याय होत असेल तर मतदारांनी याची दखल घ्यावी आणि योग्य व्यक्तींच्या बाजूने न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Municipal Election: बटण दाबूनही लाईट लागेना, मतदान केंद्रावर गोंधळ
राज्यात परिवर्तनाची आवश्यकता असल्याचे सांगत दानवे म्हणाले की, विकासाचा खोटा फुगा उभा केला जात आहे. 2025 साली राज्यात 1150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली असून हा गंभीर मुद्दा आहे. मतदारांनी खोट्या आणि भ्रमिष्ट प्रचाराला बळी न पडता सजगपणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.








