Co-opted member selection causes stir in Congress : व्हिप डावलणाऱ्यांवर कारवाईची मागणी; निष्ठावंतांचा प्रदेशाध्यक्षांसमोर संताप
Malkapur मलकापूर नगर परिषदेतील स्वीकृत सदस्य निवडीत काँग्रेस पक्षाच्या (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून, पक्षाचा अधिकृत व्हिप असतानाही काँग्रेसशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत १६ जानेवारी रोजी मलकापूर येथील काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बुलढाणा येथे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची भेट घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
मलकापूर नगर परिषदेत काँग्रेसकडून स्वीकृत सदस्यासाठी नियमानुसार एक जागा उपलब्ध असताना, प्रामाणिक व पक्षनिष्ठ कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्षाने कार्यकर्त्यांमधूनच विनय गजानन काळे यांचे नाव स्वीकृत सदस्यपदासाठी निश्चित केले होते. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव यांच्यामार्फत याबाबत अधिकृत व्हिपही जारी करण्यात आला होता.
Malkapur Municipal Council : सत्तासंघर्षात अॅड. हरीश रावळ ठरले ‘किंगमेकर’!
मात्र, नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी अतिकूर रहेमान जवारीवाले यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून काँग्रेसशी कोणताही संबंध नसलेल्या, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी अॅड. शेख शाहिद यांचे नाव स्वीकृत सदस्य म्हणून जाहीर केल्याने पक्षशिस्तीचा भंग झाला असून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार हर्षवर्धनदादा सपकाळ आणि माजी आमदार व काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना शांतपणे ऐकून घेतल्या. पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभा असतो, पक्षाने कधीही निष्ठावंतांवर अन्याय केलेला नाही. पिठासीन अधिकाऱ्यांनी केलेल्या कृतीवर पक्षातर्फे निश्चितच कारवाई केली जाईल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिल्याची माहिती उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली.
Akola Municipal Election : भाजपला दहा जागांचा फटका; काँग्रेसची भरीव कामगिरी, मनपात त्रिशंकू स्थिती
दरम्यान, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील पक्षातील व्यक्तीची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास, नवी दिल्ली येथील काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यावेळी विनय काळे, अनिल मुंधोकार, फिरोज खान, जमील रशिदखाँ जमदार, राजू उखर्डे, कैलास थाटे, शकील पठाण, सादीक खान, जावेद ठेकेदार यांच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.








