Thane politics : निकाल लागताच भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, ठाण्यात राजकीय भूकंप

Tensions rise in alliance, BJP warns of sitting on opposition benches : युतीत तणाव वाढला, विरोधी बाकांवर बसण्याचा भाजपचा इशारा

Thane : महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्ताधारी महायुतीत मोठी खळबळ उडाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडून अनपेक्षित धक्का मिळाल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं असलं, तरी निकालानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत थेट विरोधी बाकांवर बसण्याचा इशारा दिल्याने ठाण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच महापालिका निवडणूक असल्याने या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. शिवसेना फुटीचा फायदा भाजपला होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र प्रत्यक्षात ठाण्यात चित्र वेगळंच दिसून आलं. ठाणे महापालिकेच्या 131 जागांपैकी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तब्बल 75 जागांवर विजय मिळाला असून महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे, युतीत असूनही भाजपला केवळ 28 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

Malkapur Municipal Council : सत्तासंघर्षात अॅड. हरीश रावळ ठरले ‘किंगमेकर’!

निवडणूक एकत्र लढवल्यानंतरही अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. निकाल जाहीर होताच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी थेट शिंदे गटाला इशारा देत, योग्य मान-सन्मान न मिळाल्यास आम्ही वेगळा विचार करू, अशी भूमिका मांडली. वेळ पडल्यास विरोधी बाकांवर बसण्याचाही पर्याय आमच्यासमोर आहे, असं सूचक विधान त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

संजय केळकर म्हणाले की, सत्तेवर अंकुश ठेवणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. सर्वांच्या कामकाजावर लक्ष ठेवणं हीदेखील आमची जबाबदारी आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील युती तुटण्याच्या चर्चांना जोर आला आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, असं म्हणत पक्षाची भूमिका मवाळ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

Akola Municipal Election : भाजपला दहा जागांचा फटका; काँग्रेसची भरीव कामगिरी, मनपात त्रिशंकू स्थिती

दरम्यान, शिंदे गटाला ठाणे महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्याने संपूर्ण सत्ता त्यांच्या हाती जाणार आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून सुरू असलेली ही भूमिका केवळ दबावतंत्र असल्याचंही बोललं जात आहे. उपमहापौरपद, सुधार समिती आणि इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये वाटा मिळावा, यासाठी भाजपकडून प्रेशर टॅक्टिस वापरली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपने प्रत्यक्षात विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतल्यास शिंदे गटासाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. युतीतील तणाव अधिक वाढण्याची चिन्हं असून भाजपच्या इशाऱ्याला एकनाथ शिंदे कसा प्रतिसाद देतात, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

___