Efforts underway for an all-party alliance to counter BJP : ‘६० पार’ची घोषणा हवेतच विरली; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन
Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात सत्तास्थापनेचा थरार सुरू झाला आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अकोला आता ‘हंग असेंब्ली’च्या उंबरठ्यावर उभा आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून, सर्व भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येऊन महापालिकेवर सत्ता स्थापन करावी, असे जाहीर आवाहन अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपने ‘६० पार’चा नारा देत एकतर्फी विजयाचा दावा केला होता. मात्र, शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात भाजपला केवळ ३८ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. अनेक प्रभागांत भाजपचे दिग्गज उमेदवार अत्यंत अल्प मतांनी विजयी झाले, तर काहींना पराभवाचा धक्का बसला. यावरून शहरातील नागरिक भाजपच्या मागील सत्ताकाळातील कारभाराला कंटाळले असून, त्यांनी बदलाचा कौल दिला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळून शहराच्या विकासासाठी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. “अकोलेकरांनी भाजपला नाकारले असून, आता विरोधकांनी चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठावर येणे ही काळाची गरज आहे. शहराला पारदर्शक आणि लोकाभिमुख शासन देण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढाकार घेण्यास तयार आहे,” असे मत पठाण यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षांची आघाडी सत्तेवर आल्यास अकोलेकरांना मोठ्या सवलती देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. भाजपच्या काळात झालेली अवाजवी मालमत्ता करातील वाढ रद्द करणे, ‘निःशुल्क’ कचरा घंटागाडी सेवा पुन्हा सुरू करणे आणि शहराचा सर्वात मोठा प्रश्न असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे, हा अजेंडा या प्रस्तावित महाआघाडीचा असणार आहे.
Administrative Failure : बुलढाण्यात अतिक्रमणांचा विळखा कायम; २१ हजार नोटिसा पाठवूनही प्रशासन सुस्त!
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता पडद्यामागून हालचालींना वेग आला असून, वंचित बहुजन आघाडीची भूमिका या सत्तासमीकरणात किंगमेकर ठरणार आहे. येत्या काही दिवसांत अकोला महापालिकेत नवी राजकीय युती पाहायला मिळते की भाजप फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता राखते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








