Tug-of-war to form power in Amravati Municipal Corporation : महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच; अपक्षांवर लक्ष
Akola:महानगरपालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवसापासूनच सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्तेसाठी समीकरणांची जुळवाजुळव करण्याच्या कामाला भाजप, काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडे स्पष्ट बहुमत नसल्याने निर्णायक ठरणारे अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार आणि शिंदे गटाच्या उषाराणी विरक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यापैकी कोण पाठिंबा देतो, यावर सत्ता स्थापनेचे गणित अवलंबून असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांची भाजपमध्ये सन्मानजनक ‘घरवापसी’ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे भाजप व मित्रपक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससह इतर विरोधी पक्ष एकत्र येत सत्ता स्थापनेसाठी मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) एकमेव नगरसेविका उषाराणी विरक आणि अपक्ष आशिष पवित्रकार कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता सत्ता कुणाची बसणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. एकूण ८० जागांपैकी भाजपने ३८ जागा जिंकत सर्वांत मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. भाजपसोबत युती केलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महानगर विकास समितीचे प्रत्येकी एक नगरसेवक धरल्यास भाजप युतीचे संख्याबळ ४० पर्यंत पोहोचते.
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांची संख्या वाढणार !
सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बहुमताचा आकडा ४१ आहे. भाजप युतीला अजून एका नगरसेवकाच्या पाठिंब्याची गरज आहे. दुसरीकडे काँग्रेसचे २१ नगरसेवक असून, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, ‘एआयएमआयएम’, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष नगरसेवक मिळून विरोधकांचेही एकूण संख्याबळ ४० इतके आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांकडूनही हालचाली वेगाने सुरू असून, राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महापालिकेची निवडणूक अटीतटीची ठरली असून, अपक्ष व छोट्या पक्षांची भूमिका सत्ता स्थापनेत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.








