22 defeated BJP candidates complain to the Chief Minister about Navneet Rana : अमरावतीतील २२ पराभूत भाजप उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच अमरावतीत भारतीय जनता पक्षात तीव्र अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. भाजपच्या २२ पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करण्याची मागणी केली आहे.
“आमचा पराभव जनतेने नव्हे, तर नवनीत राणा यांनी केला. निवडणुकीच्या शेवटच्या पाच दिवसांत त्यांनी उघडपणे भाजपविरोधी प्रचार करत पक्षाशी गद्दारी केली,” असा खळबळजनक आरोप या उमेदवारांनी केला आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या एकूण ८७ जागांपैकी भाजपने २५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, स्पष्ट बहुमतासाठी भाजपला युवा स्वाभिमान पार्टीच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले असून, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने भाजपशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली होती. पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नवनीत राणा यांच्यावर थेट पक्षविरोधी कारवायांचा आरोप करण्यात आला आहे.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, “भाजपाच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत कौर राणा यांनी पक्षात राहून पक्षाचाच काटा काढण्याचे काम केले. भाजपचा गड असलेल्या प्रभागांत त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे करून संपूर्ण पॅनेलवर वरवंटा फिरवण्याचे नियोजन केले.”
भाजपच्या पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो लावण्याचा दबाव शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या माध्यमातून आणल्याचा आरोपही पत्रात आहे. तसेच, अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याची पत्रे काढून ती शहरभर वापरण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. निवडणूक काळात संघटनेचे पदाधिकारी कुठेच सक्रिय दिसले नाहीत आणि शेवटच्या पाच दिवसांत नवनीत राणा उघडपणे भाजपविरोधात प्रचारात उतरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Akola Municipal Corporation Election : बहुमताच्या उंबरठ्यावर भाजपची गाडी थांबली
“नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता दाखवला नाही, तर त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट करतील,” असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे. भाजपचे उमेदवार ‘डमी’ असून युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असल्याचा प्रचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, “लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा आणि विधानसभा निवडणुकीत आ. रवी राणा यांच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले. मात्र, नवनीत राणा यांनी आम्हालाच गद्दार ठरवून सामान्य कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त केले.”
भाजपाच्या प्रभावक्षेत्रात भाजपला पराभूत करून राणा दाम्पत्याने आपली राजकीय ताकद दाखवली, तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रात ते फिरकलेच नाहीत, असा आरोपही करण्यात आला आहे. “आम्ही हरलो, पराभव मान्य आहे; पण हा पराभव जनतेने नव्हे, तर गद्दारीमुळे झाला,” असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आरोपांवर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी कोणालाही उत्तर देण्यासाठी राजकारण करत नाही; मी भाजपसाठी काम करते. टीका करायची असेल, तर समोर येऊन करा. पाठीमागे बोलणाऱ्यांसाठीच मी म्हटले होते—तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला,” असे त्या म्हणाल्या.
Akola Mayor Election 2026 : अकोल्यात सत्तेचा पेच; आता महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष!
नवनीत राणा यांनी स्पष्ट केले की, “विकास करणारे नेतृत्व म्हणून रवी राणा यांची ओळख आहे. १६–१६ वर्षे सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी उमेदवार उभे करण्यात आले. युवा स्वाभिमान पार्टीसोबत भाजपची युती तुटली असली, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमच्यासोबत होते.”
“भाजपमध्ये तिकीट वाटपात काही ठिकाणी घोळ झाला. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले असते, तर ५० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते,” असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.








