Sanjay Raut strong attack on Fadnavis Shinde : संजय राऊतांचा फडणवीस–शिंदेंवर जोरदार हल्लाबोल
Mumbai: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका करत महायुतीतील अस्वस्थतेकडे लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “महायुतीचा महापौर व्हावा हे देवाच्याच मनात आहे” असे वक्तव्य केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी बहुमताच्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, आकडे जवळजवळ समसमान असून केवळ चार नगरसेवकांचा फरक आहे. प्रचंड ताकद, सत्ता आणि यंत्रणांचा वापर करूनही एवढेच बहुमत मिळाले आहे. बहुमत कितीही मोठे किंवा छोटे असले, तरी ते चंचल असते, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
Amravati Municipal Corporation : ‘आमचा पराभव जनतेने नाही, नवनीत राणांनी केला’;
एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या २९ नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले असल्याच्या चर्चांवरही संजय राऊत यांनी खोचक टिप्पणी केली. महायुतीचा महापौर बसणारच असेल, तर शिंदे गटाने २९ नगरसेवकांना कोंडून ठेवण्याची गरजच काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर सगळं इतकं सोपं असतं, तर त्यांच्या सहकारी गटाने स्वतःच्याच राज्यात नगरसेवकांना कोंडून ठेवलं नसतं, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘देवाभाऊ, यांची सुटका करा; नाहीतर नगरसेवकांचे नातेवाईक अपहरणाची तक्रार देतील’, अशी उपरोधिक टीका देखील त्यांनी केली.
Akola Municipal Corporation Election : बहुमताच्या उंबरठ्यावर भाजपची गाडी थांबली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरूनही संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली. फडणवीस अनेकदा दावोसला जातात, मात्र महाराष्ट्रात प्रत्यक्ष गुंतवणूक कधीच दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकांमध्येच असते, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत, असे म्हणत त्यांनी सरकारच्या औद्योगिक धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दावोसला बसून जर महापालिकेचे राजकारणच करायचे असेल, तर तिथे जाण्याचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Akola Mayor Election 2026 : अकोल्यात सत्तेचा पेच; आता महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष!
फडणवीस यांच्या राजकीय भूमिकेवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, ते महाराष्ट्रात नसले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हे मान्य होईल का की अमित शाह यांच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण फडणवीस यांना जितके ओळखतो, ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत, अशी टीका करत राऊतांनी त्यांच्या भूमिकेवरही बोट ठेवले.
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता निश्चित मानली जात असली, तरी महापौरपदावरून सुरू असलेल्या या आरोप – प्रत्यारोपांमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पुढील काळात महापौरपदाचा तोडगा कसा निघतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
___








