Discontent over municipal elections behind BJP MLA’s resignation : महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपावरून आमदाराचा निर्णय
Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘खास मित्र’ म्हणून ज्यांची अख्ख्या महाराष्ट्रात ओळख असलेले आमदार संदीप जोशी यांच्या राजीनाम्याने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. विरोधकांच्याही भूवया उंचावल्या आहेत. पण या राजीनाम्यातून संदीप जोशी यांनी थेट मुख्यमंत्र्यांसोबत पंगा घेतला आहे. जोशींच्या कार्यकर्त्यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून ते आंदोलनाच्या तयारीत आहेत. अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीत अपवाद वगळता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र जिंकणाऱ्या फडणविसांवर त्यांच्याच मित्रानेच नाराजी व्यक्त करणे आश्चर्याचे मानले जात आहे.
कुर्सी नहीं, कीमत बचाने चला हूँ… असा शेर उद्युक्त करत आमदार संदीप जोशी यांनी राजकीय संन्यास घोषित केला. त्यांना तेरा महिन्यासाठी विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे. मे महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. पुन्हा ‘कुर्सी‘ मिळण्याची संधी मिळणार नाही याची चाहूल लागताच त्यांनी आपला निर्णय जाहीर केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी किंमत केली नसल्याचे संदीप जोशींना म्हणायचे असेल, असेही बोलले जात आहे.
त्यांनी चार दिवसांपूर्वीच राजकीय संन्यासाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. मात्र त्यांनी जोशी यांच्यावरच काय करायचे काय नाही याचा निर्णय सोपवला होता असा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. त्यानंतरच फेसबुकवर ‘मला आता थांबायचे आहे…‘ हे पत्र त्यांनी व्हायरल केले. हे बघता जोशी नेमके मुख्यमंत्री की भाजपवर नाराज आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू मित्रांपैकी जोशी एक आहेत. सलग दोन वेळा महापालिका स्थायी समितीचे सभापती त्यांना करण्यात आले होते. नागपूर महापालिकेच्या इतिहासात हे प्रथमच घडले. त्यानंतर जोशी यांना सव्वा वर्षांसाठी महापौरसुद्धा करण्यात आले आहेत. दरम्यान नागपूर विभागीय पदवीधर मतदरसंघातून संदीप जोशी यांना तत्कालीन विद्यमान आमदार अनिल सोले यांचे तिकीट वेळेवर कापण्यात आले होते. सोले हे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक आहेत. जोशी यांच्यामुळे भाजपला हा परंपरागत मतदारसंघावर प्रथमच गमवावा लागला.
BMC Mayor 2026 : महापौर कोणाचा ठरणार हे भाजप आणि अदानी ठरवतील
पाच वर्ष मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी जोशी यांची औद्योगिक विकास महामंडळावर नियुक्ती केली होती. विधानसभेच्या निवडणुकीत युती सत्तेवर येताच विधान परिषदेच्या रिक्त झाल ल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री असताना ते फडणवीस यांच्या कार्यालयाचे मानद सचिव होते. मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे पालक होते. मात्र महापालिका निवडणुकीच्या प्रचारात जोशी कुठेच दिसले नाहीत. त्यांच्या लक्ष्मी नगर प्रभागातील भाजप नगरसेवकांचा प्रचारातही ते फिरकले नाहीत.
त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जाते. महापालिकेत दोन कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून जोशी राजकीय संन्यास घेतील यावर कोणाचा विश्वास नाही. मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र पाठवले होते. त्यावरून दोघांमध्ये काय संभाषण झाले हे कळायला मार्ग नाही. मात्र पुन्हा विधान परिषद भेटणार नाही असाच त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर अंदाज बांधला जात आहे. जोशी यांनी आता आपण निर्णय फिरवणार नाही असे ठामपणे सांगितले आहे. मात्र त्यांचे समर्थक मात्र त्यांना आग्रह करीत आहेत. ते २५ जानेवारीला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे समजते.
Weather update : राज्यात थंडीचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ – उत्तर महाराष्ट्रात शीतलहरीचा इशारा
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे यांचेसुद्धा तिकीट कापण्यात आले होते. केवळ मित्राचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आपला बळी घेतल्याचा आरोप त्यावेळी कोहळे यांनी केला होता. यापैकी बावनकुळे आणि कोहळे यांनी पुन्हा फडणवीस यांच्यासोबत जुळवून घेतले आहे. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र संदीप जोशी हे नाराज झाल्याचे दिसून येते.








