Shiv Sena (UBT) takes on a lone fight : ५५ सभा आणि तळागाळातील नियोजन; उद्धवसेनेचे संख्याबळ १ वरून ६ वर, शिंदे गटाची मोठी पिछेहाट
Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे समोर आणली आहेत. विशेषतः अकोला पूर्व मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सत्ताधारी शिंदे गटाच्या बलाढ्य यंत्रणेला रोखत लक्षणीय यश संपादन केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची मोठी फौज मैदानात असताना, दुसरीकडे उद्धवसेनेने केवळ संघटनात्मक ताकदीवर आपले संख्याबळ १ वरून थेट ६ वर नेले आहे. या निकालामुळे शहरात ‘ठाकरे’ ब्रँड अजूनही भक्कम असल्याचे संकेत मिळाले आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात उतरताना उद्धवसेनेने प्रभागनिहाय सूक्ष्म नियोजनावर भर दिला होता. स्थानिक प्रश्न, महापालिकेतील पारदर्शक कारभार आणि सामान्य मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी पक्षाने तब्बल ५५ हून अधिक सभा घेतल्या. या सातत्यपूर्ण प्रचारामुळे मतदारांचा कल उद्धवसेनेकडे वळला. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील बहुतेक प्रभागांत पक्षाच्या उमेदवारांनी पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवत आपली मतांची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढवली आहे. काही उमेदवार अवघ्या ५० ते १०० मतांनी पराभूत झाले असले, तरी एकूण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Sandip Joshi Devendra Fadnavis : कुणी कमी केली संदीप जोशींचा ‘किंमत’?, मुख्यमंत्र्यांवर थेट नाराजी
शिवसेना शिंदे गटाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्यासह माजी आमदारांची मोठी फळी अकोल्यात सक्रिय होती. मात्र, इतकी मोठी राजकीय रसद असतानाही शिंदे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या सर्व माजी नगरसेवकांना मतदारांनी साफ नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
अकोला महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अशा परिस्थितीत ६ नगरसेवक निवडून आणणाऱ्या उद्धवसेनेचे महत्त्व वाढले आहे. अकोला पूर्वमधील या विजयाने पक्षाला राजकीय बळ दिले असून, आगामी सत्तास्थापनेच्या गणितात हा गट मोठी भूमिका बजावू शकतो. भाजपने दिलेला ‘६० पार’चा नारा फसला असताना, आता भाजपविरोधी आघाडी तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
अकोला पूर्वमधील या निकालांनी केवळ आकड्यांचा खेळ न दाखवता, कार्यकर्त्यांच्या संघर्षाची आणि पक्षनिष्ठेची नवी व्याख्या मांडली आहे. आगामी काळात अकोल्याच्या राजकारणात हे बदललेले वातावरण सत्तावाटपात कसे प्रतिबिंब उमटवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








