Pratibha Dhanorkar : ‘वडेट्टीवारांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये’

Factionalism in Congress flares up, MP Dhanorkar directly challenges Wadettiwar : काँग्रेसमधील गटबाजी चिघळली, खासदार धानोरकरांचे वडेट्टीवारांना थेट आव्हान

Chandrapur : काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला असून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना आक्रमक शब्दांत इशारा दिला आहे. “वडेट्टीवारांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये. प्रत्येकाने आपआपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे,” असे स्पष्ट म्हणत त्यांनी पक्षातील गटबाजी उघडपणे समोर आणली आहे. या वादामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमधील राजकारण तापले असून प्रदेशाध्यक्षांच्या मध्यस्थीमुळे तात्पुरता संयम ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, काँग्रेसचे नगरसेवक भाजपकडे जातील, अशी शक्यता नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. कालच जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस आणि सर्व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर आज प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. मात्र सकाळीच प्रदेशाध्यक्षांचा फोन आला आणि आज शांत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. “आज शांत रहा, उद्या जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या,” असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्यामुळे आम्ही सध्या संयम बाळगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

BMC Result 2026 : ‘भाजप जिंकत नाही, पारंपरिक उमेदवार जिंकतायत!

प्रदेश किंवा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आमच्या भूमिकेला अनुकूल निर्णय दिला, तर आम्ही तो स्वीकारू, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ असे सांगत धानोरकर यांनी आपण पक्ष वाढीसाठी काम करतो, पक्ष संपवण्यासाठी नाही, असा खोचक टोमणा मारत चंद्रपूरमध्ये काँग्रेस शून्यातून उभी केली असून आज पक्ष इतक्या मोठ्या ताकदीने उभा आहे, हे विसरता कामा नये, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रात केवळ दोन महापालिकांमध्ये लातूरनंतर चंद्रपूरमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ पोहोचली असून महापौरपदही अगदी जवळ आले आहे, असे त्यांनी नमूद केले.

गेलेले किंवा निवडून आलेले नगरसेवक पक्षाच्या गटातच राहतील, असा मला शंभर टक्के विश्वास आहे, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, जिथे पक्षाचा गट स्थापन होईल, तिथे सर्व नगरसेवक काँग्रेससोबतच राहतील. जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील, त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षांकडून कठोर पक्षांतर्गत कारवाई होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “ज्यांना मी एबी फॉर्म दिले आहेत, त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ते 100 टक्के पक्षासोबतच राहतील,” असे त्यांनी सांगितले.

BMC Election : मुंबईत एकनाथ शिंदेंमुळे भाजपचं नुकसान झाल्याचा आरोप

याचवेळी प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर थेट निशाणा साधला. “हा माझा मतदारसंघ आहे. मी चंद्रपूर जिल्ह्याची खासदार असताना येथील निर्णय माझ्या नेतृत्वात होतील. विजय वडेट्टीवारांनी आपल्या ब्रम्हपुरी मतदारसंघाकडे लक्ष द्यावे. त्यांची विधानसभा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत नाही, ती गडचिरोली लोकसभेत येते,” असे म्हणत त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “मी कधीही त्यांच्या विधानसभा क्षेत्रात हस्तक्षेप करत नाही, सध्या तर तिकडे पायसुद्धा ठेवत नाही,” असे म्हणत त्यांनी आपला रोख अधिक तीव्र केला.

Nitin Nabin : नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

वडेट्टीवारांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप सुरूच ठेवला, तर त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. “उद्या त्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणूक आहे, तर मी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगणार आहे की विजय वडेट्टीवारांच्या क्षेत्रातील जिल्हा परिषद निवडणुकीतील अर्धी तिकीट मी वाटणार. ते प्रदेशाध्यक्षांना मान्य असेल, तर मलाही ते मान्य असेल,” असे थेट आव्हान देत प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र केला आहे.

या आक्रमक भूमिकेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून, महापालिका सत्तास्थापनेच्या तोंडावर हा वाद पक्षासाठी अडचणीचा ठरणार की प्रदेश नेतृत्व हस्तक्षेप करून तो मिटवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

___