Amravati Municipal Corporation : अमरावतीत आता ‘स्वीकृत’ आणि ‘स्थायी’साठी ‘फिल्डिंग’; पराभूतांच्या पुनर्वसनाची चर्चा!

Candidates defeated by slim margins lobby top leaders for positions in power : काठावर पराभव झालेल्या दिग्गजांचा सत्तेत शिरकावासाठी नेत्यांकडे तगादा

Amravati अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेच्या समीकरणांची दुसरी खेळी सुरू झाली आहे. महापालिकेत महायुतीची सत्ता येण्याचे संकेत मिळत असतानाच, आता ‘स्वीकृत नगरसेवक’ (Co-opted Corporators) आणि तिजोरीची किल्ली समजल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’वर (Standing Committee) वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ज्यांचा निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभव झाला, ते आता ‘बॅकडोअर एन्ट्री’साठी नेत्यांच्या उंबरठ्यावर चकरा मारत असल्याचे चित्र अमरावतीत दिसत आहे.

अमरावती महापालिकेच्या ८७ निर्वाचित नगरसेवक संख्येनुसार, राज्य शासनाच्या नवीन नियमावलीनुसार १० टक्के म्हणजेच सुमारे ८ ते ९ सदस्य स्वीकृत म्हणून निवडले जाऊ शकतात. मात्र, ही निवड राजकीय पक्षांच्या गटांच्या रचनेवर अवलंबून असेल. महापौर निवडीनंतर होणाऱ्या दुसऱ्या महासभेत या स्वीकृत सदस्यांची वर्णी लावली जाते. भाजप (२५), काँग्रेस (१५), युवा स्वाभिमान (१५) आणि एमआयएम (१२) या प्रमुख पक्षांच्या वाट्याला त्यांच्या संख्याबळानुसार या जागा येणार आहेत.

Pratibha Dhanorkar : ‘वडेट्टीवारांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये’

महापालिकेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. हे पराभूत उमेदवार आता स्वीकृत सदस्यत्वासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, “ज्यांना मतदारांनी नाकारले, त्यांना पुन्हा सत्तेत कशाला घ्यायचे?” असा सवाल करत दोन्ही बाजूंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी ‘पराभूतांना संधी देऊ नका’ अशी मोहीम सुरू केली आहे. पक्षवाढीसाठी नवीन आणि सक्रिय चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

महापालिकेत खरी सत्ता आणि अर्थकारण हे स्थायी समितीच्या माध्यमातून चालते. १६ सदस्यांच्या या समितीत जाण्यासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये मोठी चुरस आहे. विशेषतः स्थायी समितीचे सभापती पद कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, यावर सत्तेतील वाटाघाटींचे गणित अवलंबून असेल. या समितीतील सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असल्याने, पहिल्या टप्प्यातच वर्णी लागावी म्हणून अनेक नगरसेवक आपल्या राजकीय गॉडफादरकडे वजन वापरत आहेत.

BMC Result 2026 : ‘भाजप जिंकत नाही, पारंपरिक उमेदवार जिंकतायत!

निवडणुकीपूर्वी अमरावतीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. त्यावेळी बंडखोरी रोखण्यासाठी भाजप आणि इतर प्रमुख पक्षांनी काहींना ‘स्वीकृत नगरसेवक’ पदाचे गाजर दाखवले होते. ज्यांनी बंडखोरी मागे घेऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी जिवाचे रान केले, त्यांचे पुनर्वसन करणे आता नेत्यांसमोर मोठे आव्हान असेल.
अमरावती महापालिका पक्षीय बलाबल (Final Tally):
भाजप: २५
काँग्रेस: १५
युवा स्वाभिमान पक्ष: १५
एमआयएम: १२
राष्ट्रवादी (अजित पवार): ११
शिंदेसेना: ३
बसप: ३
उद्धवसेना: २
वंचित बहुजन आघाडी: १