BJP dominance over the Standing and all Subject Committees : स्थायी व सर्व विषय समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व; महत्त्वाच्या सभापतीपदी भाजप नेत्यांची निवड
Khamgao खामगाव नगरपालिकेच्या स्थायी व विविध विषय समित्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध केले आहे. सोमवार, १९ जानेवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये नगरपालिकेच्या सर्व महत्त्वाच्या समित्यांवर भाजप समर्थित नगरसेवकांचीच वर्णी लागली असून, शहराच्या कारभारावर भाजपाचा दबदबा कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत बांधकाम समिती सभापतीपदी सतिषआप्पा दुडे, आरोग्य समिती सभापतीपदी प्रविण कदम, शिक्षण समिती सभापतीपदी स्नेहल गरड, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ज्योती भुसारी, तर पाणीपुरवठा समिती सभापतीपदी प्रशांत नायसे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी फातेमा बी. मो. नईम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Mehkar Municipal Council : मेहकर नगरपालिकेत काँग्रेस–शिंदे गटाची बाजी; प्रत्येकी तीन सभापती
नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपासूनच भाजपाने खामगावमध्ये आपले संख्याबळ आणि राजकीय वर्चस्व वाढवले असून, नगराध्यक्ष, बहुसंख्य नगरसेवक तसेच स्वीकृत सदस्यांमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. नगरपालिकेत भाजपाचे तब्बल ३४ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने स्थायी व विषय समित्यांच्या निवडणुकांमध्येही पक्षाने सहज बाजी मारली.
ही निवडणूक आमदार आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अपर्णा फुंडकर व सर्व नगरसेवक-नगरसेविकांच्या उपस्थितीत पार पडली. नगरपालिकेतील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती एकूण १० सदस्यांची आहे. त्यामध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, पाचही विषय समित्यांचे सभापती तसेच अन्य सदस्यांचा समावेश आहे.
प्रत्येक विषय समितीत एकूण ९ सदस्य असतील. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे ७ सदस्य तर विरोधी पक्षाचे २ सदस्य असणार आहेत. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी हे पीठासीन अधिकारी होते. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
खामगाव नगरपालिकेतील स्थायी व विषय समित्यांवरील या निवडणुकीमुळे आगामी काळात शहराच्या विकासात्मक निर्णयांवर भाजपाचे नियंत्रण अधिक बळकट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.








