BJP and Congress accelerate efforts for government formation : अकोला महापालिकेच्या सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच, भाजप, काँग्रेसच्या हालचालींना वेग
Akola महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच, महापालिकेतील दुसरा मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनेही भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तासंघर्ष अधिकच रंगतदार झाला आहे. दरम्यान, भाजपने फोडाफोडीचा राजकीय डाव साधला असून, त्यांच्या गळाला १० जण लागल्याची चर्चा आहे. चर्चेची ही ‘मशाल’ खरेच पेटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसे झाल्यास भाजपकडे महापालिका सभागृहातील संख्याबळ ४८ पर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, यासाठी काही नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी केल्याचीही माहिती आहे.
या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ३८ नगरसेवक निवडून आले असून, साध्या बहुमतासाठी भाजपला अवघ्या तीन नगरसेवकांची आवश्यकता आहे. दुसरीकडे काँग्रेसचे २१ नगरसेवक विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सहा, वंचित बहुजन आघाडीकडे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडे तीन, तसेच एमआयएमकडे तीन नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना शिंदे गट, महानगर विकास समिती आणि एक अपक्ष यांच्याकडे प्रत्येकी एक नगरसेवक आहे. त्यामुळे ४१ चा ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी दोन्ही प्रमुख पक्षांकडून रणनीती आखली जात आहे.
काँग्रेसकडून भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र आणत आघाडी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे भाजपने गोपनीयता पाळत रणनीती आखली असून, दोन राजकीय पक्षांचे मिळून सहा नगरसेवक गळाला लावल्याची माहिती आहे. निकाल जाहीर होताच भाजपने ‘फिल्डिंग’ लावत विविध पक्षांच्या नगरसेवकांशी थेट संपर्क साधल्याचे समजते.
निकालाच्या पहिल्याच दिवसापासून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून, पडद्यामागे बैठका, चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहेत. कोणता पक्ष ‘मॅजिक फिगर’ गाठून सत्ता स्थापन करतो, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
Khamgao Municipal Council : खामगाव नगरपालिकेवर भाजपाचा निर्विवाद ‘दबदबा’
संख्याबळ (मॅजिक फिगर : ४१)
भाजप : ३८
काँग्रेस : २१
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : ६
वंचित बहुजन आघाडी : ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) : ३
एमआयएम : ३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : १
शिवसेना शिंदे गट : १
महानगर विकास समिती : १
अपक्ष : १








