BMC Elections: भाजपच्या बंडखोरीचा फटका, मुंबईत 11 जागांवर पराभव

Shinde Sena’s direct accusation, expressing displeasure with statistics : शिंदेसेनेचा थेट आरोप, आकडेवारीसह नाराजी व्यक्त

Mumbai: मुंबई महापालिका निवडणूक 2026 मध्ये महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी भाजपच्या बंडखोर उमेदवारांमुळे शिवसेनेला मोठा फटका बसल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं केला आहे. भाजप आणि शिवसेना युतीनं मिळून 118 जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपला 89 जागा मिळाल्या असून शिवसेनेला 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मात्र शिवसेनेच्या नेत्यांचा आरोप आहे की भाजपच्या बंडखोरीमुळे किमान 11 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले.

शिवसेनेनं मुंबई महापालिकेत 92 जागांवर निवडणूक लढवली होती. जागावाटपानुसार शिवसेनेकडे गेलेल्या सुमारे 30 प्रभागांमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत थेट किंवा अप्रत्यक्षपणे विरोध केला, असा दावा शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांकडून केला जात आहे. या बंडखोरीमुळे अनेक ठिकाणी मतांचं विभाजन झालं आणि त्याचा थेट फटका शिवसेनेला बसल्याचं चित्र समोर आलं आहे.

Wadettiwar vs Dhanorkar : खासदार झाले म्हणून मालक ठरत नाहीत, इतिहास काढायला गेलं तर सगळंच बाहेर येईल!

शिवसेना नेते समाधान सरवणकर यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे कथित व्हॉट्स ॲप चॅट सार्वजनिक करत सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. तर प्रभाग क्रमांक 173 मधील माजी नगरसेवक रामदास कदम यांनी भाजपनं कटकारस्थान करून आपला उमेदवार निवडून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुस्लिमबहुल भागांतील पराभवाचं खापर शिवसेनेच्या माथी फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

आकडेवारी पाहिली असता अनेक प्रभागांमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी हजारो मतं घेतल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाल्याचं स्पष्ट होतं. अंधेरी पूर्वेतील प्रभाग क्रमांक 121 मध्ये शिवसेनेच्या प्रतिमा खोपडे यांचा अवघ्या 14 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी भाजपच्या मंडल अध्यक्ष जयश्री वळवी यांनी बंडखोरी करत 175 मतं घेतली होती. वर्सोवा प्रभाग क्रमांक 61 मध्ये शिवसेनेचे राजूल पटेल यांचा 2005 मतांनी पराभव झाला असून भाजपच्या बंडखोर उमेदवार उर्मिला गुप्ता यांनी 2737 मतं घेतली.

Shivsena symbol controversy : शिवसेना चिन्ह गोठवले जाण्याचीही शक्यता, सुनावणी पुढे ढकलली !

कुर्ला प्रभाग क्रमांक 169 मध्ये शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर यांचा 970 मतांनी पराभव झाला. येथे भाजपचे बंडखोर उमेदवार अमित शेलार यांनी तब्बल 3225 मतं घेतली. सायन कोळीवाड्यातील प्रभाग क्रमांक 173 मध्ये शिवसेनेच्या पूजा कांबळे यांचा 4974 मतांनी पराभव झाला असून भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांना 9310 मतं मिळाली आहेत.

दिंडोशी, मागाठाणे, वांद्रे पूर्व, अणूशक्ती नगर आणि कुलाबा या प्रभागांमध्येही अशाच प्रकारची परिस्थिती दिसून आली असून भाजपच्या बंडखोर उमेदवारांमुळे शिवसेनेचा विजय हुकल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी अंतर्गत बंडखोरीमुळे निर्माण झालेली नाराजी आता उघडपणे समोर येत असून आगामी काळात युतीतील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.