Marathi won Maharashtra won Hindutva and development agenda won created a stir in political circles : ‘मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, हिंदुत्व व विकासाचा अजेंडा जिंकला’ या मजकुराने राजकीय वर्तुळात खळबळ
Nagpur : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीदिनीच भारतीय जनता पक्षाने ठाकरे बंधूंना अप्रत्यक्ष टोला देणारे बॅनर लावल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. नागपूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये झळकलेल्या या होर्डिंगमुळे भाजपने आभार मानले की विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या होर्डिंगवर “मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व व विकासाचा अजेंडा जिंकला… धन्यवाद महाराष्ट्र!” असा ठळक मजकूर आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटोही झळकत आहेत. विशेष म्हणजे मराठी अस्मिता आणि मराठी मतांच्या मुद्द्यावर राजकारण करणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची नावे न घेता त्यांनाच उद्देशून हा संदेश देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Akola Politics : निवडणुका सरताच नेत्यांना आली आठवण; रखडलेल्या विकासकामांचा ‘पाहणी’!
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात चौकाचौकात, प्रमुख रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच हे होर्डिंग झळकल्याने त्याच्या वेळेवरूनही भाजपवर टीका होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मराठी अस्मितेशी जोडलेले असताना, त्याच दिवशी ठाकरे बंधूंना डिवचणारा संदेश देण्यात आल्याने अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी मतांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला होता. या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा आक्रमकपणे मांडत भाजपवर टीका केली होती. मात्र, निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर “मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला” असा दावा करत भाजपने मराठीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनाच मतदारांनी नाकारले, असा सूचक संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
.https://sattavedh.com/mayoral-election-reservation-for-open-category-announced-intense-lobbying-in-bjp-12-contenders-in-fray/
भाजपकडून या बॅनरद्वारे मतदारांचे आभार मानण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी ‘हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला’ या ओळीमधून पक्षाने आपली वैचारिक भूमिका पुन्हा अधोरेखित करत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. या होर्डिंगची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, भाजपच्या या आभार प्रदर्शनामागचा नेमका राजकीय संदेश काय, यावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
__








