Chandrashekhar Bawankule : अंतर्गत वादावर पडदा! पालकमंत्री आज नगरसेवकांसोबत करणार वन‌-टू-वन चर्चा

Guardian Minister to hold discussion with BJP corporators : अमरावतीत सत्तास्थापनेसाठी महायुती आघाडीवर, भाजपचा महापौर होणार असल्याचा राणांचा दावा

Amravati अमरावती महापालिका निवडणुकीत २५ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ अपुरे असल्याने समविचारी पक्षांच्या मदतीने महापौरपद भाजपकडेच राहावे, यासाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, २४ जानेवारी रोजी नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांशी ‘वन टू वन’ चर्चा करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

ना. बावनकुळे शनिवारी अमरावती जिल्हा दौऱ्यावर असून दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या (डीसीपी) बैठकीत निधीविषयक आढावा घेणार आहेत. या बैठकीनंतर ते अमरावती महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने स्थानिक भाजप नेत्यांशी चर्चा करतील.

Maharashtra politics : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी भाजपकडून ठाकरे बंधूंना डिवचणारे बॅनर

दरम्यान, नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत स्वतंत्रपणे ‘वन टू वन’ संवाद साधत पुढील राजकीय वाटचालीबाबत मंथन करण्यात येणार आहे. याशिवाय, भाजपच्या पराभूत उमेदवारांशीही पालकमंत्री संवाद साधून पराभवामागची कारणे जाणून घेणार आहेत. ‘५५ प्लस’चा दावा अपयशी ठरण्यामागील कारणे, त्यास जबाबदार घटक, नेमकी कुठे चूक झाली, यावर ना. बावनकुळे यांचा विशेष फोकस असणार आहे.

पालकमंत्र्यांचा हा दौरा अधिकृतपणे प्रशासकीय स्वरूपाचा असला, तरी भाजपमधील या पडद्याआड घडामोडींची कुठेही अधिकृत नोंद नाही. दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पालकमंत्री अमरावतीत उपस्थित राहणार आहेत.

अमरावती महापालिकेचे १७ वे महापौर हे सर्वसाधारण प्रवर्गातून असणार आहेत. त्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवारी मोजक्या भाजप पदाधिकाऱ्यांशी महापौरपदासाठी पात्र उमेदवारांच्या नावांवर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परिणामी, महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांच्या नजरा या दौऱ्याकडे लागल्या आहेत.

भाजप, युवा स्वाभिमान, शिंदेसेना, बसप आणि उद्धवसेना यांची मोट बांधून ४८ सदस्यांचे संख्याबळ उभे करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. सत्तास्थापनेसाठी ४४ सदस्य पुरेसे असताना, चार सदस्यांचे अतिरिक्त संख्याबळ राखून ठेवण्याची खेळी असल्याचे बोलले जात आहे.

विरोधकांच्या प्रत्येक हालचालींवर भाजपचे लक्ष असून काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि एमआयएम यांना सत्तेपासून दूर ठेवण्याची स्पष्ट रणनीती आखली आहे. एकूणच, अमरावती महापालिकेवर महायुतीचाच महापौर विराजमान होईल, अशी राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत. मित्रपक्षांना समाधानी ठेवण्यासाठी आवश्यक ते ‘लाड’ पुरविले जात असल्याचीही चर्चा आहे.

Sudhir Mungantiwar : रामकथा म्हणजे रामधर्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा अभूतपूर्व उत्सव

अमरावती महापालिकेत महापौर भाजपचाच होणार असून हे एक लाख टक्के सत्य असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार असून यामध्ये कोणतेही किंतु-परंतु नाही, असे ते म्हणाले. सत्तास्थापनेसाठी आवश्यक ते ४८ सदस्यांचे संख्याबळ महायुतीकडे असल्याने विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या चर्चा या केवळ वावड्या असल्याचेही आ. राणा यांनी स्पष्ट केले.