The alliance has taken a stand against BJP in the Zilla Parishad : जिल्हा परिषदेत भाजपविरोधात आघाडीने शड्डू ठोकला
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य वाटणाऱ्या समीकरणांची पुन्हा प्रचिती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आली आहे. राज्यभर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट हे चारही पक्ष बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. भाजपला रोखण्यासाठी या चारही पक्षांनी महाआघाडी स्थापन करत जिल्हा परिषद निवडणुकीत थेट लढाईची तयारी केली असून, या घडामोडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या महाआघाडीची अधिकृत घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे. आज सायंकाळी चार वाजता बार्शी येथे निर्धारण मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीप सोपल यांनी केले आहे. या निर्धारण मेळाव्यात महाआघाडीची पुढील रणनीती, उमेदवारांची नावे आणि भाजपविरोधातील राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana : एका कॉलवर तक्रारींचे निरसन करण्यासाठी 181 हेल्पलाईन सुरू !
बार्शी तालुक्याचे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून आमदार दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन प्रमुख नेत्यांभोवती फिरत आले आहे. पक्ष वेगळे असले तरी निवडणुकीचा सामना नेहमीच या दोन गटांमध्ये रंगलेला पाहायला मिळतो. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी विरुद्ध माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजप असा थेट सामना होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
राज्य पातळीवर ठाकरे आणि शिंदे गट, तसेच अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांविरोधात उभे असताना, स्थानिक राजकारणात मात्र भाजपविरोधासाठी हे चारही पक्ष एकाच व्यासपीठावर आले आहेत. दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे ही बार्शीच्या राजकारणातील अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक घडामोड मानली जात आहे. या आघाडीमुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
Akola Municipal Corporation Election : महानगरपालिकेत सत्तेसाठी भाजपविरोधी आघाडीची रणनीती
आज होणाऱ्या निर्धारण मेळाव्यात महाआघाडीची भूमिका अधिक ठामपणे मांडली जाणार असून प्रचाराची दिशा, जागावाटप आणि भाजपविरोधातील आक्रमक रणनीती जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बार्शीच नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष या मेळाव्याकडे लागले असून, ही महाआघाडी जिल्हा परिषद निवडणुकीत काय चमत्कार घडवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.








