Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या एका पत्रानंतर राष्ट्रीय- राज्य महामार्गावर असलेल्या महिलांच्या स्वच्छता गृहांना अद्ययावत करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे आदेश

MLA Mungantiwar sensitive initiative for the comfort, safety and health of women : महिलांच्या सोयी, सुरक्षितता व आरोग्यासाठी आ. मुनगंटीवार यांची संवेदनशील पुढाकार

Chandrapur : राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या स्वच्छ व सुरक्षित शौचालयांच्या प्रश्नावर राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे पत्र लिहून ठामपणे भूमिका मांडली. त्यांच्या या संवेदनशील व लोकहिताच्या मागणीला गांभीर्याने दखल घेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने अधिकृत स्पष्टीकरण देत देशभरातील पेट्रोल पंपांवरील शौचालय व्यवस्थेबाबतची सद्यस्थिती स्पष्ट केली असून महामार्गांवरील पेट्रोल पंपांवर महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित शौचालय अद्ययावत करण्याचे स्पष्ट अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.*

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री. हरदीपसिंगजी पुरी यांना पत्र पाठवून राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील पेट्रोल पंपांवर महिलांसाठी उच्च दर्जाची, स्वच्छ, सुरक्षित व सन्मानजनक शौचालये अनिवार्य करण्याची ठोस मागणी केली होती. महिलांना राष्ट्रनिर्माणाची प्रमुख शक्ती मानणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणांचा संदर्भ देत त्यांनी स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ यांसारख्या उपक्रमांची आठवण करून दिली. महामार्गांवरील प्रवासादरम्यान मातां, भगिनींना व मुलींना मूलभूत सुविधांचा अभाव भासू नये, ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली होती.

Sudhir Mungantiwar : रामकथा म्हणजे रामधर्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा अभूतपूर्व उत्सव

आपल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले होते की, पेट्रोल पंप हे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे विश्रांती व थांब्याचे केंद्र असते. मात्र अनेक ठिकाणी शौचालयांची अवस्था समाधानकारक नसल्याने महिलांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. स्वच्छतेचा अभाव, पाणी व वीजेची कमतरता, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा नसणे, रात्री अपुरा प्रकाश आणि सुरक्षिततेचा अभाव या बाबी विशेषतः वृद्ध महिला, गर्भवती महिला व लहान मुलींसाठी अडचणी निर्माण करतात, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.

आ. मुनगंटीवार यांच्या या पाठपुराव्यानंतर पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयातील संचालक श्री. अरुण कुमार यांनी अधिकृत उत्तर देत तेल विपणन कंपन्यांच्या अंतर्गत पेट्रोल पंप डीलर्सना ग्राहक सेवेसाठी किमान मानके पाळणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये स्वच्छ, आरोग्यदायी व वापरयोग्य शौचालयांची उपलब्धता अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Sudhir Mungantiwar : रामधर्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा अभूतपूर्व उत्सव

मंत्रालयाच्या माहितीनुसार, पेट्रोल पंप डीलर्सना दररोज शौचालयांची तपासणी करणे आवश्यक असून स्वच्छता, पुरेसा प्रकाश, कार्यरत फ्लश, पाण्याची उपलब्धता, दरवाज्यांची योग्य व्यवस्था, स्पष्ट दिशादर्शक फलक, सर्व प्रवाशांसाठी मुक्त प्रवेश आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच ग्राहकांच्या अभिप्रायासाठी शौचालयाजवळ ‘दर्पण’ क्यूआर कोड लावणेही अनिवार्य असून नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाते, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत देशभरात एकूण ९०,२५१ पेट्रोल पंप कार्यरत असून त्यापैकी ७२,६०७ तेल विपणन कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या सर्व पेट्रोल पंपांवर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयांची तरतूद बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी नियमितपणे पेट्रोल पंपांची पाहणी करून स्वच्छतेवर व सुविधांवर लक्ष ठेवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले निवडणूक प्रक्रियेत क्रांतिकारी बदल आवश्यक

महिलांच्या सन्मान, आरोग्य आणि सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या विषयावर पुढाकार घेत केंद्र सरकारकडे ठोस भूमिका मांडल्यामुळे आ. सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका पुन्हा एकदा लोकहितकारी आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून अधोरेखित झाली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पेट्रोल पंपांवरील सुविधांबाबत सकारात्मक चित्र समोर आले असून, या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

___