First time since independence, individuals from 10 districts honored : स्वातंत्र्यानंतर प्रथमच १० जिल्ह्यांतील व्यक्तींना गौरव
New Delhi : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्रीय गृह विभागाने रविवारी केली. कला, संस्कृती, लोकपरंपरा, कृषी, विज्ञान, समाजसेवा, वैद्यकीय क्षेत्र, क्रीडा, उद्योग आणि प्रबोधन अशा विविध क्षेत्रांत कोणताही गाजावाजा न करता पण समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
यंदा जाहीर झालेल्या यादीत एकूण ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश असून, त्यामध्ये १९ महिला, ६ विदेशी नागरिक (एनआरआय, पीआयओ व ओसीआय) तसेच १६ मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे. ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ८४ जिल्ह्यांमधील मान्यवरांना या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार यादीत महाराष्ट्राने नेहमीप्रमाणे आपला ठसा उमटवला असून राज्यातील १५ मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाला आहे. यामध्ये १ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच महाराष्ट्रातील परभणीसह देशातील विविध १० जिल्ह्यांतील व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाला आहे. ३९ हजारांहून अधिक नामांकनांमधून सखोल, काटेकोर आणि वैज्ञानिक पद्धतीने बहुपातळी तपासणी व व्यापक सल्लामसलत करून एकूण १३१ पुरस्कारार्थी निवडण्यात आले आहेत. गेल्या १२ वर्षांत १८ हून अधिक राजकीय पक्षांतील आणि २२ राज्यांतील नेत्यांना पद्म पुरस्कार देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
महाराष्ट्रातून कला, लोकसंस्कृती आणि परंपरा क्षेत्रात भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. ९० वर्षीय आदिवासी कलाकार असलेल्या धिंडा यांनी दुधी भोपळा आणि बांबूपासून तयार होणाऱ्या ‘तारपा’ या आदिवासी वाद्याचे जतन व प्रचार करण्यासाठी आयुष्यभर योगदान दिले आहे. तमाशा लोककलेच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती केल्याबद्दल रघुवीर तुकाराम खेडकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सिनेसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी माधवन रंगनाथन आणि रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील कार्यासाठी सतीश शहा यांचा सन्मान करण्यात आला आहे.
कृषी व नवोन्मेष क्षेत्रात कापूस शेतीतील उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणारे तंत्र विकसित केल्याबद्दल श्रीरंग देवबा लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजसेवा व वैद्यकीय क्षेत्रात मुंबईच्या आर्मिडा फर्नांडिस यांना आशियातील पहिली ‘मानवी दूधपेढी’ स्थापन करून हजारो नवजात बालकांचे प्राण वाचवल्याबद्दल पद्म सन्मान देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जनार्दन बापूराव बोथे यांना जलसंधारण व ग्रामविकास क्षेत्रातील आदर्श कार्यासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे.
विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात झुझेर वासी यांना ‘सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट’च्या माध्यमातून भेंडी बाजार पुनर्विकास प्रकल्प राबवून शहरी पुनरुत्थानाचे आदर्श मॉडेल उभे केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून दोन आयसीसी करंडक जिंकून दिल्याबद्दल रोहित शर्मा यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
Local body elections : वाद टाळा, समजून घ्या; महायुतीचा एकोपा महत्त्वाचा
व्यापार आणि उद्योग क्षेत्रात नागपूरस्थित ‘सोलर ग्रुप’चे संस्थापक सत्यनारायण नुवाल यांना त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेल्या ‘नागास्त्र’सारख्या ड्रोनमुळे भारतीय लष्कराची ताकद वाढवण्यात दिलेल्या योगदानासाठी पद्म सन्मान मिळाला आहे. तसेच ‘दास ऑफशोअर’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत कंपनीचे संस्थापक अशोक खाडे यांना तेल व वायू क्षेत्रातील जागतिक कंपन्यांना अत्याधुनिक तांत्रिक सेवा पुरवल्याबद्दल पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
विविध क्षेत्रांतील निःस्वार्थ, सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्याची दखल घेत दिलेले हे पद्म पुरस्कार महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.








