E-Governance : १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचे निकाल जाहीर

Selection of best government offices in evaluation Indian Quality Council : भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यमापनात सर्वोत्कृष्ट शासकीय कार्यालयांची निवड

Mumbai : राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचा अंतिम निकाल प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आले असून, विविध संवर्गांतील सर्वोत्कृष्ट कार्यालयांची निवड करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त समाजमाध्यमावरून दिली. त्यांनी राज्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत, ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व कार्यालयांचे अभिनंदन केले. आपल्या संदेशात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे सखोल आणि अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत पार पडले आहे.

Padma Awards : पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील १५ मान्यवरांना ‘पद्म’ सन्मान

या कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन सात महत्त्वाच्या आणि सर्वंकष निकषांवर करण्यात आले. यामध्ये कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, ‘आपले सरकार’ प्रणालीचा प्रभावी वापर, ई-ऑफीस प्रणालीची अंमलबजावणी, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर, शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग तसेच जीआयएस तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर या बाबींचा समावेश होता. या सर्व निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली आहे.

मूल्यमापनानंतर जाहीर करण्यात आलेल्या यादीत जिल्हाधिकारी कार्यालय या संवर्गात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने अव्वल स्थान पटकावले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय या संवर्गात ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाची निवड झाली आहे. महानगरपालिका संवर्गात पनवेल महानगरपालिका, पोलिस आयुक्त कार्यालय संवर्गात नाशिक पोलिस आयुक्तालय, विभागीय आयुक्त कार्यालय संवर्गात नागपूर विभागीय आयुक्तालय तर पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय संवर्गात नांदेड कार्यालयाचा समावेश आहे. राज्यस्तरीय आयुक्तालय व संचालनालय संवर्गात तंत्र शिक्षण संचालनालयाची निवड करण्यात आली असून, राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे व प्राधिकरण संवर्गात महाराष्ट्र सागरी मंडळाने उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. मंत्रालयीन विभाग संवर्गात सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वोत्तम कामगिरी केल्याचे घोषित करण्यात आले आहे.

National pride : दुर्गम भागातील अतुलनीय धाडसाचा राष्ट्रीय गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, विविध संवर्गांतील उत्कृष्ट कार्यालयांची सविस्तर यादी जाहीर करण्यात आली असून, ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे येत्या ८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच या १५० दिवसांच्या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या संपूर्ण चमूचा राज्य शासनातर्फे लवकरच गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सेवा सुलभता आणि नागरिकांचा विश्वास वाढवण्याच्या दिशेने राज्य शासनाने टाकलेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, या कार्यक्रमामुळे प्रशासनात कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.