Chandrapur Municipal Corporation : वडेट्टीवार-धानोरकर वादात नगरसेवकांची पळवापळवी, प्रकरण पोलीस ठाण्यात!

Wadettiwar–Dhanorkar clash triggers rush for corporators : ‘समृद्धी’वर नगरसेवकांची बस अडवली; पाच नगरसेवकांच्या गायब होण्यावरून काँग्रेसचे दोन दिग्गज नेते आमनेसामने; सत्तास्थापनेपूर्वीच पक्षांतर्गत गृहयुद्ध

Wardha “आमच्यातील मतभेद संपले असून चंद्रपूरचा महापौर काँग्रेसचाच होईल,” असा दावा वरिष्ठ नेत्यांकडून केला जात असतानाच, प्रत्यक्षात मात्र चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत कलह विकोपाला गेला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवरून हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. पाच नगरसेवकांना पळवून नेल्याचा आरोप आणि त्यानंतर समृद्धी महामार्गावर झालेली बसची अडवणूक यामुळे हे प्रकरण आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या स्वप्नाला मोठा तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापौरपदाची निवडणूक अवघ्या १२ दिवसांवर असताना हा संघर्ष उफाळून आला आहे. पुण्याहून नागपूरच्या दिशेने येणारी नगरसेवकांची बस पहाटे साडेसहाच्या सुमारास समृद्धी महामार्गावर धानोरकर समर्थकांनी अडवली. चेहऱ्यावर कापड बांधलेल्या समर्थकांनी बसमध्ये घुसून नगरसेवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे दोन्ही गटांत जोरदार खडाजंगी झाली. वडेट्टीवार समर्थकांनी पाच नगरसेवक पळवल्याचा आरोप झाला होता, त्यातील दोन नगरसेवक पुन्हा धानोरकर गटात परतले आहेत. उर्वरित तीन नगरसेवकांसाठी दोन्ही गटांत ओढाताण सुरू आहे.

Ajit Pawar death news : मातृतीर्थ पोरके! सिंदखेडराजाच्या विकासासाठी अखेरपर्यंत तळमळ

या राजकीय वादाचे रूपांतर आता फौजदारी गुन्ह्यात झाले आहे. हिंगणघाट आणि सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, त्यांना अडवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कानेन सिद्दीक, सौरभ ठोंबरे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक असून सत्ता स्थापनेसाठी आणखी ६ जणांची गरज आहे. खासदार धानोरकर यांनी १३ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केल्याने पक्षातील दुफळी स्पष्ट झाली होती. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हस्तक्षेप करून महापौरपद धानोरकर गटाला आणि स्थायी समिती वडेट्टीवार गटाला देण्याचा ‘मध्यस्थी फॉर्म्युला’ मांडला होता. वडेट्टीवार यांनी हा फॉर्म्युला मान्य असल्याचे सांगितले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी नगरसेवकांच्या पळवापळवीमुळे वरिष्ठ नेत्यांचा हा तोडगा अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे.

दोन बड्या नेत्यांमधील या संघर्षामुळे काँग्रेसच्या हातात असलेली सत्ता निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. नगरसेवकांच्या या पळवापळवीमुळे भाजप किंवा इतर अपक्ष गटांना संधी मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता या प्रकरणावर काय तोडगा काढतात आणि १२ दिवसांनंतर होणाऱ्या महापौर निवडणुकीत कोणता गट वरचढ ठरतो, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.