Amravati Municipal Corporation : भाजपचं ठरलं! २५ नगरसेवकांच्या नेतृत्वाची जबाबदारी अनुभवी चेहऱ्याकडे

BJP assigns leadership of 25 corporators to a veteran leader : गटनेतेपदी माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

Amravati अमरावती महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात आली असताना, भारतीय जनता पक्षाने आपल्या गटनेत्याची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या २५ नगरसेवकांचे नेतृत्व करण्यासाठी माजी महापौर चेतन गावंडे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांशी सुरू असलेल्या वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय अनुभव असलेल्या नेत्याची निवड करून भाजपने महापालिकेत आपली पकड मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत.

अमरावती येथील भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीत गटनेते निवडीचा विषय अजेंड्यावर होता. माजी महापौर संजय नरवणे यांनी चेतन गावंडे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला नगरसेविका राधा कुरिल यांनी अनुमोदन दिले. साईनगर-अकोली प्रभागातून निवडून आलेल्या गावंडे यांच्या नावावर सर्व २५ नगरसेवकांनी एकमताने संमती दर्शविली. या निवडीप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, शिवराय कुलकर्णी आणि दिनेश सूर्यवंशी यांसह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrapur Municipal Corporation : वडेट्टीवार-धानोरकर वादात नगरसेवकांची पळवापळवी, प्रकरण पोलीस ठाण्यात!

भाजप हा महापालिकेत २५ जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. आगामी महापौर निवडीच्या वेळी फोडाफोडी टाळणे आणि मित्रपक्षांशी समन्वय साधण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज होती. चेतन गावंडे यांनी यापूर्वी महापौर, शिक्षण सभापती आणि स्थायी समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा हा अनुभव महापालिकेच्या कामकाजात आणि पक्षांतर्गत शिस्त राखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

अमरावती महापालिकेत बहुमतासाठी ४४ या जादूई आकड्याची गरज आहे. भाजपकडे स्वतःचे २५ नगरसेवक असून, त्यांना युवा स्वाभिमान पार्टी (१५) आणि अन्य अपक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. अशा परिस्थितीत, गटनेता म्हणून चेतन गावंडे यांना पक्षाच्या नगरसेवकांना एकसंध ठेवण्यासोबतच मित्रपक्षांशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. ३० जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष बैठकीत भाजप आपला महापौर बसवण्यासाठी कोणती रणनीती आखते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.