Allegation that the BJP defeated itself : उमेदवारी देऊनच पाडल्याचा दावा, अकोल्यातील राजकारणात अंतर्गत संघर्षाचा स्फोट
Akola महानगरपालिका निवडणुकीपासून सुरू झालेली अस्वस्थता आता थेट महापौरपदाच्या निवडणुकीपर्यंत पोहोचली असून, अकोल्यातील भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारी वाटपाच्या टप्प्यापासूनच काही विशिष्ट व्यक्तींनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप निष्ठावान व पराभूत उमेदवारांनी केला आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात पळापळी करणारे, गुप्त हालचाली घडवून आणणारे आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना अप्रत्यक्षपणे पराभूत करणारे चेहरे आता उघड होत असल्याचा दावा केला जात आहे. महापालिका निवडणुकीत भाजपानेच भाजपाचा पराभव केला, असा थेट आरोप पक्षातील काही माजी नगरसेवक, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा ‘ऑन दि स्पॉट फोन’; प्रशासन लागले कामाला !
विशेष म्हणजे, काही उमेदवारांना जाणीवपूर्वक उमेदवारी देऊन नंतर त्यांचा पराभव घडवून आणल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या आरोपांमागे ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करत संबंधितांनी प्रदेशस्तरीय नेतृत्वाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, या तक्रारींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान अचानक घडलेल्या ‘मोठ्या ट्विस्ट’मुळे ही नाराजी अधिकच उफाळून आली आहे. शेवटच्या क्षणी झालेल्या हालचाली, बदललेली समीकरणे आणि अनपेक्षित मतदान पद्धतीमुळे पक्षांतर्गत कटकारस्थानाच्या चर्चेला जोर आला आहे. ‘एकच व्यक्ती किंवा विशिष्ट गट भाजपाला कमकुवत करण्याचा कट रचत आहे का?’ असा थेट संशय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे व्यक्त केला जात आहे.
सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, भाजप सत्तेत असतानाही अंतर्गत गटबाजी, स्वार्थी राजकारण आणि वैयक्तिक अजेंडे यामुळे पक्षाची ताकद कमकुवत होत आहे. वेळीच कठोर भूमिका घेतली नाही, तर आगामी काळात पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
Political movements : अजित पवारांना अखेरचा निरोप दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग
या संपूर्ण प्रकरणाची प्रदेशस्तरावर गंभीर दखल घेतली जाणार का, की पुन्हा एकदा निष्ठावान कार्यकर्त्यांनाच डावलले जाणार, याकडे संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे. एकंदरच, भाजपातील हा अंतर्गत विस्फोट आगामी काळात अकोल्याच्या राजकारणाला नवे वळण देणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.








