Congress power struggle in Chandrapur Municipal Corporation directly on Samruddhi Highway : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सत्तासंघर्ष थेट समृद्धी महामार्गावर
Chandrapur : राजकारणातील फोडाफोडी, गटबाजी आणि सत्तासंघर्ष नवीन नाही, मात्र चंद्रपूर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने आता धोकादायक वळण घेतल्याचे चित्र समोर आले आहे. चंद्रपूर महानगरपालिका सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाकडून पक्षातीलच नगरसेवकांना समृद्धी महामार्गावरून ‘उचलण्याचा’ प्रयत्न केल्याचा थेट आणि गंभीर आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे ‘काँग्रेस विरुद्ध काँग्रेस’ असा संघर्ष उघडपणे समोर आला असून पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
रितेश तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटातील काही नगरसेवक पुणे ते नागपूरकडे प्रवास करत असताना वर्धेजवळ समृद्धी महामार्गावर त्यांना अडवण्यात आले. पहाटे सहा वाजता पाच-सहा स्कॉर्पिओ वाहनातून 25 ते 30 जण आले असून त्यांच्या हातात चाकू, लाठ्या असल्याचा आरोप आहे. संबंधितांनी नगरसेवकांची बस थांबवून वाहनाची चावी काढून घेतली, महिलांशी वाद घातला आणि ‘आमच्याशी बोलून प्रश्न सोडवा, अन्यथा जबरदस्ती घेऊन जाऊ’ अशी धमकी दिल्याचा गंभीर दावा तिवारी यांनी केला आहे.
या घटनेदरम्यान दोन मिनिटांत पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचल्याने संशयितांनी पळ काढल्याचेही तिवारी यांनी सांगितले. हा प्रकार केवळ राजकीय दबावापुरता मर्यादित नसून तो थेट गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शस्त्र दाखवणे, धमकावणे आणि कथित अपहरणाचा प्रयत्न यामुळे हा प्रकार कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रितेश तिवारी यांनी आरोप करताना सांगितले की, या घटनेमागे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातीलच काही लोक असल्याची माहिती आहे आणि संपूर्ण जिल्ह्याला हे माहीत आहे. “काँग्रेस हा संस्कारांचा पक्ष आहे, मात्र सध्या काही गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात सक्रिय झाले असून अशा घटनांमुळे पक्षाची बदनामी होत आहे,” असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या गटबाजीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरसेवक फोडाफोडीचे आरोप, धमकीचे प्रकार आणि पोलिसांपर्यंत पोहोचलेले प्रकरण यामुळे आगामी काळात चंद्रपूर काँग्रेसमधील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
_








