Maharashtra gets its first woman Deputy Chief Minister, simple ceremony at Lok Bhavan : महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री, लोकभवनात साधेपणात सोहळा
Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीसह सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, राज्याच्या राजकीय इतिहासात हा एक नवा अध्याय मानला जात आहे.
लोकभवनातील दरबार हॉलमध्ये मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव तसेच राजशिष्टाचार अधिकारी या वेळी उपस्थित होते. कोणताही गाजावाजा न करता, केवळ काही मिनिटांत हा सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. शोकाकुल वातावरणात संवेदनशीलता जपण्यावर भर देण्यात आला.
Sunetra Pawar : पण अजितदादांचं स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून जड अंतःकरणाने होकार!
शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांनी त्यास अनुमोदन दिले. एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही माहिती लेखी स्वरूपात दिली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे पत्र राज्यपालांकडे पाठवण्यात आले आणि शपथविधीचा मार्ग मोकळा झाला.
शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. अजित पवार यांच्या दहाव्या दिवसापर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार असून, दुखवटा संपेपर्यंत कोणतेही सत्कार, हार किंवा औपचारिक अभिनंदन स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शोककाळात नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असतानाही साधेपणा आणि संवेदनशीलता जपण्यावर त्यांचा भर राहणार आहे.
oath ceremony : राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेनेच शपथविधीची घाई?
१८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे जन्मलेल्या सुनेत्रा पवार या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. १९८५ मध्ये त्यांचा विवाह झाला. काटेवाडी, बारामती येथे आल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. ग्रामस्वच्छता चळवळीपासून पर्यावरण संवर्धन, आरोग्य शिबिरे, महिलांसाठी कर्करोग जनजागृती, ओढा खोलीकरण आणि वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.
घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी पक्षफुटीनंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही त्या खचल्या नाहीत. राज्यसभेवर पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी सभापती अध्यक्षपदाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली. आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवला असून, शोकातून उभ्या राहिलेल्या या निर्णायक क्षणी त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवले गेले आहे.
__








