Akola Municipal Corporation : महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच

Power tussle in the municipal corporation over Standing Committee chief’s post : शहर सुधार समितीतील कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?; पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष

Akola अकोला महानगरपालिकेतील सत्तासमीकरणे आता निर्णायक टप्प्यावर आली असून, शहरातील सर्वाधिक प्रभावी मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौर व उपमहापौर निवडीनंतर आता सत्ताधारी पक्षाचा खरा कस लागणार असून, शहर सुधार समितीतील कोणत्या नगरसेवकाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार, याकडे राजकीय वर्तुळासह अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

स्थायी समिती ही महापालिकेची ‘पॉवर हाऊस’ मानली जाते. कोट्यवधी रुपयांचे अंदाजपत्रक, विकासकामांचे प्रस्ताव, निधीचे वाटप यावर या समितीचा थेट प्रभाव असतो. त्यामुळे या महत्त्वाच्या पदासाठी इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. काही नगरसेवकांनी उघडपणे, तर काहींनी दबक्या आवाजात आपली इच्छा व्यक्त केली आहे.

मात्र अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरच अवलंबून असल्याने सध्या सर्वच इच्छुक नेते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. शहर सुधार समितीतील काही अनुभवी नगरसेवकांनी आपल्या कामाचा लेखाजोखा वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. कुणी संघटनात्मक निष्ठेचा दाखला देत आहे, तर कुणी निवडणुकीतील योगदानाची आठवण करून देत आहे.

Amravati Municipal Corporation : अमरावती महापौरपदासाठी नागपुरात खलबते

सत्ताधारी पक्षात एकीकडे जोरदार चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे समतोल साधणारा निर्णय घ्यावा असा सूरही ऐकू येत आहे. महिला, युवा, अनुभवी तसेच सामाजिक समीकरणांचा विचार करून सभापती निवड होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे काही नावांवर प्राथमिक चाचपणी सुरू झाल्याचे समजते. विशेष म्हणजे काही नवोदित नगरसेवकही ‘आमचीही संधी’ असल्याचा सूर लावत असल्याने अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे.

Akola Airport Development : अकोला विमानतळाला संत गजानन महाराजांचे नाव द्या

‘स्थायी समिती सभापती कोण?’ हा प्रश्न सध्या अकोल्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. पक्षश्रेष्ठींचा कौल कुणाच्या बाजूने झुकणार, कुणाचे स्वप्न पूर्ण होणार आणि कुणाला प्रतीक्षा वाढणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आगामी काही दिवसांत हा निर्णय होण्याचे संकेत असून, तो निर्णय अकोला महापालिकेच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा ठरणार आहे.
दरम्यान, काही इच्छुक नगरसेवकांचे फोन अचानक वाढले असून, भेटीगाठींचे सत्रही जोरात सुरू असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.